देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या(जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याला दिल्ली उच्च न्यायालयाने ६ महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जेएनयू प्रकरणी कन्हैय्यानंतर उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्या यांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने कन्हैय्याच्या जामीन अर्जावरील सुनावणीला स्थगिती दिली होती. अखेर बुधवारी झालेल्या सुनावणीत कन्हैय्याला दिल्ली उच्च  न्यायालयाने दिलासा देत ६ महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
दरम्यान, विद्यापीठात ९ फेब्रुवारी रोजी देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांच्या सातपैकी तीन क्लिप्समध्ये फेरफार करण्यात आल्याचे न्यायवैद्यक तपासणीत स्पष्ट झाले आहे. दिल्ली सरकारकडून संबंधित ध्वनिचित्रफितींचे काही नमुने हैदराबाद येथील सत्यता पडताळणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यापैकी तीन व्हिडिओ क्लिप्समध्ये गंभीर फेरफार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. या क्लिप्समध्ये काही विशेष शब्द टाकण्यात आल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader