अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची युक्रेनला ८ अब्ज डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करण्याची घोषणा केली आहे. रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला मदत म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे जो बायडने यांनी म्हटलं आहे. खरं तर एकीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी पाश्चिमात्य देशांना आण्विक अस्त्र वापरण्याची धमकी दिली आहे, तर दुसरीकडे आज अमेरिकेने युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही तिसऱ्याची युद्धाची नांदी तर नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने युक्रेनला ८ अब्ज डॉलर्सचा शस्त्रपुरवठा करणार असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. रशियाने युक्रेनचा काही भाग अवैधरित्या ताब्यात घेतला असून अशा परिस्थिती युक्रेनना पाठिंबा देणं ही अमेरिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे, त्यामुळे मी युक्रेनसाठी ही मदत जाहीर करत असल्याचे जो बायडेन म्हणाले. दरम्यान, हा निर्णय घेऊन आम्ही युक्रेनच्या मदतीसाठी प्रतिबद्ध आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न बायडेन यांनी केला असल्याचं आता बोललं जातं आहे.
अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या लष्करी मदतीत ‘जॉइंट स्टँडऑफ वेपन’ सारख्या अत्याधुनिक शस्रांचा समावेश आहे. या शस्रामुळे आता युक्रेनला एका सुरक्षित अंतरावरून रशियन सैन्यांवर क्षेपणास्र डागता येणार आहे. जो बायडेन यांनी जाहीर केलेली मदतीतचा एका मोठा भाग म्हणजे जवळपास ५.५ अब्ज डॉलर्सची तरतूद सोमवारपूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. कारण सोमवारी अमेरिकेतील आर्थिक वर्षाच्या समाप्ती होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेने ही मदत जाहीर केली असली, तरी या शस्रे रशियाच्या भूमीवर हल्ला करण्यासाठी नाही, असं स्पष्टीकरण व्हाईट हाऊसकडून देण्यात आलं आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या या मदतीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. कारण एकीकडे अमेरिकेने ही मदत जाहीर केली आहे, तर दुसरीकडे रशियाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांना आण्विक अस्त्र वापरण्याची धमकी दिली आहे. रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, बुधवारी राजधानी मॉस्कोमध्ये पुतिन यांनी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली होती. यात त्यांनी अण्वस्त्रांच्या वापरासंबंधातील अटी आणि शर्ती बदलणार असल्याचेही या बैठकीत सांगितले. तसेच अण्वस्त्रधारी देशांच्या मदतीने युक्रेननं पारंपरिक क्षेपणास्त्रांचा वापर केला तर तो अण्वस्त्रधारी देशांनी व युक्रेननं संयुक्तरीत्या केलेला हल्ला समजण्यात येईल आणि त्याचे उत्तर अण्वस्त्रांनी देण्यात येईल, असंही व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे.