पीटीआय, वॉशिंग्टन : अमेरिकेत राहणाऱ्या एका ७८ वर्षीय भारतीय वंशाच्या अभियंत्याला ‘व्हिडिओ कॉल’वर भारतातील त्याच्या एका मरणासन्न नातलगाशी हिंदीत बोलल्याने नोकरीवरून काढून टाकल्याची घटना उघड झाली आहे. या संदर्भात दाखल कायदेशीर खटल्याची माहिती देत माध्यमांनी ही बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल वार्ष्णेय हे अलाबामामध्ये संरक्षक क्षेपणास्त्र कंत्राटदार कंपनीत दीर्घ काळ काम करत होते. त्यांनी नोकरीवरून काढून टाकण्याच्या कारवाईला अलाबामाच्या उत्तर जिल्हा न्यायालयात जूनमध्ये आव्हान दिले आहे. त्यात अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनाही संरक्षण क्षेपणास्त्र कंपनीचे कायदेशीर प्रतिनिधी या नात्याने या खटल्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. वार्ष्णेय हे हंट्सविल येथील संरक्षण क्षेपणास्त्र कंत्राटदार कंपनी ‘पार्सन्स कॉर्पोरेशन’ येथे ‘वरिष्ठ प्रणाली अभियंता’ म्हणून काम करत होते.  वार्ष्णेय यांनी आरोप केला, की भेदभावातून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

काय घडले?

  • ‘एएल डॉट कॉम’ ने दिलेल्या वृत्तानुसार २६ सप्टेंबर २०२२ रोजी वार्ष्णेय यांना भारतातून त्यांचे मरणासन्न मोठे मेव्हणे के. सी. गुप्ता यांचा मोबाईलवर ‘व्हिडीओ कॉल’ आला होता. गुप्तांना वार्ष्णेय यांच्याशी अखेरचे बोलायचे होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व पुन्हा गुप्तांशी बोलता येणार नाही म्हणून वार्ष्णेय एका कार्यालयातील रिकाम्या कक्षात जाऊन बोलल्याचे या खटल्यातील तपशीलात नमूद केले आहे.
  • हा ‘व्हिडीओ कॉल’ सुरू होण्याआधी वार्ष्णेय यांनी आजूबाजूला कोणतीही गोपनीय कागदपत्रे, संरक्षण क्षेपणास्त्र कंपनी किंवा ‘पार्सन्स’शी संबंधित कोणतीही कागदपत्रे नसल्याची खात्री करून घेतली होती. मात्र, वार्ष्णेय यांच्या एका गोऱ्या सहकाऱ्याने त्यांना मोबाईलवर हिंदीत बोलताना ऐकले व त्यांना हटकले व कुठल्याही दूरध्वनी संपर्काची तिथे परवानगी नसल्याची आठवण त्यांना करून दिली.
  • वार्ष्णेय यांनी लगेच हा दूरध्वनी संवाद थांबवला. अवघी दोन मिनिटे त्यांचा आपल्या मेव्हण्यांशी हिंदीत अखेरचा संवाद झाला. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job lost due to video call talk in hindi with brother in law in america ysh