पीटीआय, वॉशिंग्टन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘अमेरिकेत नव्याने प्रस्तावित ‘गोल्ड कार्ड’ उपक्रमांतर्गत अमेरिकी कंपन्या अमेरिकी विद्यापीठामधील भारतीय पदवीधरांना नोकऱ्या देऊ शकतील,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी बुधवारी ‘गोल्ड कार्ड’ उपक्रमाचे अनावरण केले. या उपक्रमांतर्गत अमेरिकेबाहेरील श्रीमंत व्यक्तींना ५० लाख अमेरिकी डॉलर (४३.५७ कोटी रुपये) शुल्क भरून अमेरिकेत राहता आणि काम करता येणार आहे. तसेच, अमेरिकी नागरिकत्वही मिळण्याकडे वाटचाल सुकर होणार आहे. ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही गोल्ड कार्डची विक्री करणार आहोत. तुमच्याकडे ग्रीन कार्ड आहे. हे आता गोल्ड कार्ड आहे. आम्ही त्या कार्डवर त्याची सुमारे ५० लाख अमेरिकी डॉलर ही किंमत टाकणार आहोत. या कार्डद्वारे ग्रीन कार्डचे हक्क मिळतील. तसेच, नागरिकत्वाकडे वाटचाल सुरू होईल. श्रीमंत व्यक्ती या कार्डची खरेदी करून देशात येतील.’

सध्याची स्थलांतरांसाठीची व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिवाद्यांना, विशेषत: भारतीयांसाठी अडथळा ठरत असल्याचे सांगून ट्रम्प म्हणाले, ‘भारत, जपान, चीन आणि इतर देशांमधून येणारे विद्यार्थी हार्वर्ड किंवा वॉर्टन स्कूल ऑफ फायनान्स येथे शिकतात. त्यांना नोकरीची ऑफर येते. मात्र, ती लगेच रद्द होते. कारण संबंधित विद्यार्थी अमेरिकेत राहणार, की नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांना देशाबाहेर जावे लागते. हे विद्यार्थी संबंधित देशात जाऊन चांगले उद्याोजक बनतात. हजारो लोकांना रोजगार देतात. हे रोखण्यासाठी कंपनी गोर्ड कार्डची खरेदी करून तिचा वापर नोकरी देण्यासाठी करू शकतील.’ अशा लक्षावधी कार्डची विक्री होईल, असा अंदाज ट्रम्प यांनी व्यक्त केला.

ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेला धोका!

भारतीय मालावर आयातशुल्क लादण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रहाबद्दल काँग्रेस पक्षाने गुरुवारी चिंता व्यक्त केली. केंद्रातील मोदी सरकारने या अपमानास्पद वागणुकीविरोधात भूमिका घ्यावी आणि अमेरिकेची धोरणे भारतात स्वीकारली जाणार नाहीत असे ट्रम्प यांना सांगावे असे आवाहन काँग्रेस नेते अजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत केले. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारताची अर्थव्यवस्था नष्ट होईल असा इशाराही त्यांनी दिला. अजय कुमार यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ आणि ट्रम्प यांच्या भेटीच्या, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीच्या ध्वनिचित्रफिती दाखवल्या आणि त्यांची तुलना केली. कुमार म्हणाले की, ‘‘ट्रम्प हे आपले सर्वोत्तम मित्र असल्याचे मोदी म्हणतात पण ते नेहमी भारताचा अपमान करायचा प्रयत्न करतात.’’