सध्या अटकेत असलेले स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्याविरोधात पोलिसांकडे वेगवेगळ्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली असल्याचे जोधपूर पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसाराम बापू यांना गेल्या शनिवारी रात्री इंदूरमधून अटक करण्यात आली. आसाराम सध्या जोधपूरमधील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत.
वेगवेगळ्या पीडितांनी आसाराम यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारींचे स्वरुप काय आहे आणि तक्रारदार कोण आहेत, याची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलिसांच्या तपासात मदत करण्याची तयारीही यापैकी काही तक्रारदारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, लैंगिक शोषणाच्या खटल्यात आसाराम यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांचे पथक अहमदाबादमधील आश्रमाकडे रवाना झाले आहे. आसाराम बापूंचा हा मुख्य आश्रम असून, तेथून काही पुरावे हाती लागतात का, याची चाचपणी पोलिस करताहेत. आसाराम यांचा सहायक शिवा याच्याकडून कोणतीही सीडी किंवा क्लिप हस्तगत करण्यात आली नसल्याचेही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवाच्या मोबाईलमधील क्लिपमध्ये आसाराम बापूंच्या ‘लीला’! 

Story img Loader