गेल्या महिन्याभरात भारतात मोठ्या प्रमाणावर करोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. मृतांचे आकडे देखील वेगाने वाढत असताना देशात अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिविर आणि लसींचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वीपर्यंत सामान्य परिस्थिती असलेल्या भारतात अचानक करोनाचं इतकं भीषण रुप कसं धारण केलं? आणि दुसऱ्या लाटेचा इतका जोरदार तडाखा भारताला कसा बसला? यावर जगभरात खलबतं सुरू असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी भारतात करोनाची इतकी वाईट परिस्थिती उद्भवल्याचं कारण स्पष्ट केलं आहे. तसेच, भारतात निर्माण झालेल्या परिस्थितीमधून अमेरिका आणि जगाला तीन गोष्टी शिकायला मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
“भारताचा अंदाज चुकला”
करोनाच्या परिस्थितीविषयी भारताचा अंदाज चुकल्याचं फौची यांनी सांगितलं. “भारत आज करोनाच्या इतक्या भयंकर परिस्थितीत सापडला याचं कारण म्हणजे भारतानं परिस्थितीचा चुकीचा अंदाज बांधला आणि योग्य वेळेपूर्वीच सर्व व्यवहार सुरू केले”, असं फौची म्हणाले आहेत. “भारताला वाटलं की करोना आता देशात संपला आहे. त्यामुळे त्यांनी खूप लवकर सर्व गोष्टी सुरू करायला सुरुवात केली. त्यामुळे सध्या भारतात वेगाने फैलावत असलेल्या करोनाचं भीषण रुप आपल्या सगळ्यांना दिसत आहे”, असं ते म्हणाले.
भारतातील परिस्थितीमुळे मिळाला धडा!
दरम्यान, यावेळी बोलताना डॉ. फौची यांनी भारतात निर्माण झालेल्या परिस्थितीतून अमेरिका आणि जगालाच तीन गोष्टी शिकायला मिळाल्याचा उल्लेख केला. “भारतातल्या परिस्थितीतून एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे परिस्थितीला कधीही कमी लेखू नये. दुसरी महत्त्वाची बाब लक्षात आली ती सार्वजनिक आरोग्यासंदर्भातली. भविष्यातल्या साथींसाठी देखील सार्वजनिक आरोग्याबाबत तयार राहाणं हे आपण शिकलो. गेल्या दशकभरात आपण त्यावर वेगवेगळ्या माध्यमातून काम करतच होतो ही जमेची बाजू!”
“भारतातील परिस्थितीतून मिळालेला तिसरा धडा म्हणजे अशा प्रकारच्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. जगभरात निर्माण झालेल्या संकटात विशेषत: लसीकरणाच्या बाबतीत आपण फक्त आपल्याच देशासाठी नव्हे, तर इतर देशांसाठी देखील एकत्र मिळून प्रयत्न करायला हवेत”, असं देखील ते म्हणाले. “जगात कुठेही करोनाचा प्रादुर्भाव असेल, तर त्याचा थेट धोका अमेरिकेला असेल”, असं देखील डॉ. फौची म्हणाले.
देशात मृत्यूची त्सुनामी; २४ तासांत करोनाबळींचा नवा उच्चांक
भारतात करोनाची भीतिदायक आकडेवारी!
भारतात गेल्या २४ तासांत तीन लाख ४८ हजार ४२१ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर याच कालावधीत तीन लाख ५५ हजार ३३८ जणांनी करोनावर मात केली. चिंतेची बाब म्हणजे देशात एका दिवसात झालेल्या मृतांच्या संख्येनं नवा विक्रम नोंदवला आहे. देशात मंगळवारी ४,२०५ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींची संख्या आता २,५४,१९७ वर पोहोचली आहे.