अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची नात नाओमी बायडेन हिच्या सुरक्षा व्यवस्थेत संरक्षण यंत्रणेकडून काही त्रुटी आढळल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या त्रुटींचा फायदा घेत तीन अज्ञातांनी नाओमीच्या एसयूव्हीच्या खिडकीची काच फोडण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे तणाव निर्माण झाला होता. परिणामी नाओमीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एंजट्सने गोळीबार केला. परिस्थिती खूप गंभीर असल्याने गोळीबार करावा लागला, असं म्हटलं जात आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची नात नाओमी हिच्या सुरक्षेसाठी सीक्रेट सर्व्हिस एंजट्सची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. हे संरक्षण अधिकारी नेहमी तिच्याबरोबर असतात. या संरक्षण अधिकाऱ्यांसह नाओमी जॉर्जटाऊनमध्ये होती. तिची कार एका ठिकाणी उभी असताना काही लोकांनी तिच्या कारकडे धाव घेतली आणि कारच्या खिडकीची काच फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाओमीच्या सुरक्षा जवानांनी गोळीबार केला. अद्याप या घटनेबाबत पूर्ण माहिती मिळाली नाही.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी घटनेबाबतचा कोणताही तपशील देण्यास नकार दिला. तीन अज्ञातांनी नाओमीच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही. तीन अज्ञात कारची काच फोडण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा जवानांनी गोळीबार केला. गोळीबार होताच तिघेही तिथून पळून गेले. हे तिघे एका लाल रंगाच्या कारमध्ये बसून पळून गेले. पोलीस सध्या या कारचा आणि तीन हल्लेखोरांचा तपास करत आहेत.
हे ही वचा >> सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी, पंतप्रधान कार्यालयाची अवहेलना पडली महागात
नाओमी ही जो बायडेन यांचे पूत्र हंटर बायडेन आणि कॅथलीन बायडेन यांची मुलगी आहे. ती २९ वर्षांची असून गेल्या वर्षी तिचा विवाह पार पडला. नाओमी ही वकील आहे. ती वॉशिंग्टन डीसीतच लहानाची मोठी झाली आहे. नाओमी ही जो बायडेन यांची खूप लाडकी आहे. ती तिच्या आजोबांना म्हणजेच अमेरिकेच्या अध्यक्षांना प्रेमाने पॉप्स अशी हाक मारते.