पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना २६ जानेवारी रोजी भारतात साजरा केला जाणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. परतुं, बायडेन या कार्यक्रमाला येणार नाहीत, अशी बातमी समोर आली आहे. भारत पुढच्या वर्षी क्वाड देशांच्या शिखर परिषदेचंही आयोजन करणार आहे. ही बैठक जानेवारी महिन्यात होणार होती जी आता पुढे ढकलण्यात आली आहे. क्वाड बैठक प्रजासत्ताक दिनाच्या आसपासच आयोजित केली जाणार होती. त्यामुळे जो बायडेन हे प्रजासत्ताक दिन आणि क्वाड बैठक अशा दोन गोष्टींसाठी सलग काही दिवस भारतात येणं अपेक्षित होतं. परंतु, आता अशी माहिती मिळाली आहे की, बायडेन प्रजासत्ताक दिन सोहळ्याला येऊ शकणार नाहीत. तसेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, क्वाड देशांची बैठकदेखील पुढच्या वर्षीच्या अखेरीस आयोजित केली जाऊ शकते.
पुढच्या वर्षी भारतात होणारी क्वाड देशांची बैठक वर्षाच्या अखेरीस आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. भारत सरकार आता सुधारित तारखांवर काम करत आहे. क्वाड देशांच्या प्रतिनिधींशी बोलून याबाबतचं वेळापत्रक ठरवलं जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी मे महिन्यात जपानच्या हिरोशिमा येथे आयोजित जी-७ शिखर परिषदेत सहभागी झाले होते. त्यावेळी मोदी यांनी घोषणा केली होती की, क्वाड देशांच्या पुढच्या बैठकीचं आयोजन भारतात केलं जाईल. भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान हे क्वाडचे सदस्य देश आहेत. ‘क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग’ (क्वाड) ही अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांमधील धोरणात्मक युती आहे. या युतीची स्थापना २००७ साली झाली होती. आशिया-पॅसिफिक प्रदेशात म्हणजेच हिंद महासागर आणि प्रशांत महासागरादरम्यान येणाऱ्या सागरी क्षेत्रावरील चीनच्या वाढत्या प्रभावाला लगाम घालणं हे क्वाडच्या निर्मितीचं मुख्य अघोषित उद्दिष्ट आहे.
हे ही वाचा >> “…त्यापेक्षा मी मरण पत्करेन”, नाराजीच्या चर्चेदरम्यान शिवराज सिंह चौहान यांचं वक्तव्य
यंदा (२०२३) प्रजासत्ताक दिनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. भारत दरवर्षी प्रजासत्ताक सोहळ्यासाठी जगभरातल्या मोठमोठ्या नेत्यांना आमंत्रित करतो. २०२१ आणि २०२२ मध्ये करोनाच्या प्रादूर्भावामुळे भारताने या कार्यक्रमासाठी कोणालाही बोलावलं नव्हतं. तर पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमासाठी भारताने बायडेन यांना आमंत्रण पाठवलं होतं.