Joe Biden on Trump assassination attempt : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाकडून यंदा राष्ट्राध्यक्ष पदासाठी दावेदार असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल (१४ जुलै) जीवघेणा हल्ला झाला. पेनसिल्व्हेनिया येथे झालेल्या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ माजली. या हल्ल्यानंतर अमेरिकेत राजकीय वातावरण तापले असताना आता विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमधून राष्ट्राला संबोधित केले असून या प्रकरणी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्राला संबोधित करताना बायडेन म्हणाले, “जे काही घडले त्याबद्दल आज मला तुमच्याशी बोलायचे आहे. एका माजी राष्ट्राध्यक्षावर गोळीबार झाला आणि या हल्ल्यात एक अमेरिकन नागरिकाचा बळी गेला. हा नागरिक आपल्या पसंतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी तिथे जमला होता. अमेरिकेच्या इतिहासावर नजर टाकली असता हिंसा हे कोणत्याही प्रश्नावर उत्तर असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला या रस्त्याने जायचे नाही. अमेरिकेत हिंसाचाराला स्थान नाही. तसेच हिंसेचे सामान्यीकरण आम्ही होऊ देणार नाही. सध्या देशात राजकीय वातावरण तापले आहे. पण माझे आवाहन आहे की, आता शांतता राखा. आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. मला माहितीये, आपल्यात तीव्र मतभेद असू शकतील. या निवडणूकत चुरस दिसत आहे. या निवडणुकीतून जनतेने केलेली निवड अमेरिका आणि संपूर्ण विश्वाचे पुढील काही दशकांचे भविष्य ठरविणार आहे.”

हे वाचा >> अमेरिकेतील आतापर्यंतचे राजकीय हल्ले

जो बायडेन यांनी सहा मिनिटांचे भाषण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. आपल्या भाषणात बायडेन यांनी एकसंघ राहण्यावर भर दिला. तसेच ६ जानेवारी रोजी राजधानीवर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला. देशात राजकारणाने टोक गाठले असल्यामुळे आता सर्वांनीच थोड सबुरीने घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

प्रचारसभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार (फोटो – )

शनिवारी काय घडले?

● बटलर टाऊनमध्ये मोकळ्या मैदानावरील सभेवेळी ट्रम्प यांच्यावर गोळीबार.

● हल्लेखोर थॉमस मॅथ्यू क्रूक्स (२०) घटनास्थळीच सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात ठार.

● ट्रम्प यांच्या कानाला दुखापत, जिवाला धोका नाही.

● अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची ट्रम्प यांच्याशी चर्चा.

● हल्लेखोर रिपब्लिकन पक्षाचा नोंदणीकृत मतदार होता.

● त्याच्या वाहनामध्ये तसेच घरामध्ये तपास यंत्रणांना बॉम्ब तयार करण्याचे साहित्य आढळून आले आहे.

● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत माथेफिरूंकडून राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्राध्यक्ष आणि पक्षाच्या अध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारांना लक्ष्य करून राजकीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अब्राहम लिंकन यांच्यासह चार अध्यक्षांची हत्या, तर तीन अध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joe biden on donald trump assassination attempt speaks about violence and politics urges time to cool it down kvg