Israel-Hamas War: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गाझा आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धांबाबत त्यांच्या कार्यालयातून एक संदेश जारी केला आहे. यामध्ये बायडेन यांनी म्हटलं आहे, आपण अशा वळणावर आलो आहोत की आत्ता आपण जे काही निर्णय घेऊ त्याचे आपल्या भविष्यावर दीर्घकालीन परिणाम जाणवणार आहेत. आपले आजचे निर्णय हे पुढच्या अनेक दशकांमधलं आपलं भविष्य ठरवणार आहेत. या संदेशात बायडेन यांनी त्यांच्या इस्रायल दौऱ्याचाही उल्लेख केला. गाझामध्ये शेकडो नागरिकांना ओलीस ठेवण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जो बायडेन म्हणाले, अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून माझ्यासाठी ओलीस ठेवण्यात आलेल्या अमेरीकन नागरिकांच्या सुरक्षेशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट अधिक महत्त्वाची नाही. मी इस्रायलमध्ये कणखर आणि दृढ लोकांना पाहिले, जे खूप रागातही आहेत. तर काहीजण धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. काहीजण दुःखात आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, मी पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष अब्बास यांच्याशी संवाद साधला. पॅलेस्टिनी नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचं त्यांना सांगितलं. गाझातल्या रुग्णालयात झालेल्या स्फोटात शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचा जीव गेल्याचं वृत्त कळताच मला खूप दुःख झालं. परंतु, तो स्फोट इस्रायली सैन्याने केलेला नाही. अशा घटनेत जेव्हा निष्पाप लोकांचा बळी जातो तेव्हा खूप वाईट वाटतं. निष्पाप पॅलेस्टिनी नागरिकांकडे मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहायला हवं. कारण पॅलेस्टिनी लोकांना तिथे केवळ शांततेनं राहायचं आहे.

बायडेन म्हणाले, अलिकडच्या काळात काही शक्तींनी द्वेष आणि वर्णद्वेषाला खतपाणी घातलंय. अमेरिकेतही ज्यूंचा द्वेष, मुस्लिमांचा द्वेष वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. मी मुस्लीम अमेरिकन सुमदाय, अरब अमेरिकन सुमदाय, पॅलेस्टिनी अमेरिकन समुदाय आणि इतर अनेक संघटनांना वैयक्तिकरित्या ओळखतो. यापैकी बरेच जण सध्या रागावले आहेत.

हे ही वाचा >> इस्रायल-हमास युद्धावरून जो बायडेन यांना अमेरिकन खासदाराने सुनावलं, म्हणाल्या, “जागे व्हा आणि…”

जो बायडेन यांनी यावेळी गाझात सुरू असलेल्या संघर्षाची रशिया-युक्रेन युद्धाशी तुलना केली आहे. हमास आणि पुतिन हे वेगवेगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात. परंतु, त्यांच्यात एक गोष्ट समान आहे. हमास आणि पुतिन दोघांनाही वाटतं की आपल्या शेजारच्या देशातील लोकशाही पूर्णपणे नष्ट व्हावी.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Joe biden says hamas russia threaten democracy in neighboring countries asc
Show comments