तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी लाखो नागरिकांची धडपड सुरू असताना गुरुवारी काबूल विमानतळ स्फोटांनी हादरले. विमानतळाबाहेर झालेल्या दोन आत्मघाती स्फोटांत ६० जण ठार झाले असून, किमान १४० जण जखमी झाले. मृतांमध्ये १३ अमेरिकी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चांगलेच संतपाल्याचं पहायला मिळत असून त्यांनी या हल्ल्याचा हिशेब चुकता केला जाईल असा इशारा दिलाय.

नक्की वाचा >> अफगाणिस्तान संघर्ष : पंतप्रधान मोदींचं ‘ते’ वक्तव्य तालिबानला झोंबलं; भारताला दिला इशारा

व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बायडेन यांनी इस्लामिक स्टेटशी संलग्न दहशतवादी संघटनांना थेट इशारा दिलाय. आम्ही हा हल्ला विसरणार नाही आणि यासाठी हल्लेखोरांना माफीही मिळणार नाही असं बायडेन म्हणाले आहेत. “ज्यांनी हे हल्ले घडवून आणलेत आणि ज्यांना अमेरिकेला त्रास देण्याची इच्छा आहे त्यांनी लक्षात ठेवावं की आम्ही तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही हा हल्ला विसरणारही नाही. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि याचा हिशेब चुकता करु,” असं बायडेन म्हणालेत.

नक्की वाचा >> काबूल विमानतळ हल्ला : “…यासाठी आपण देवाचे आभारच मानले पाहिजेत”; १६० शीख, हिंदू थोडक्यात बचावले

काबूलमधील हल्ल्यांनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला काही वेळ मौन बाळगून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अमेरिकेचा राष्ट्रध्वज एका दिवसासाठी अर्ध्यावर उतरवण्यात आलाय. “हे कोणी घडवून आणलं आहे याचा अंदाज आपल्या सर्वांनाच आहे पण त्याबद्दल आपल्याला अद्याप खात्री नाहीय,” असं बायडेन यांनी हा हल्ला घडवून आणणाऱ्यांबद्दल बोलताना सांगितलं.

तसेच या हल्ल्यांनंतरही अमेरिकेकडून सुरु असणारी बचाव मोहीम सुरु राहणार असल्याचं बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही सर्व अमेरिकन नागरिक, आम्हाला सहकार्य करणारे अफगाणिस्तानमधील आमच्या सहकाऱ्यांची सुखरुप सुटका केली जाईल, असं बायडेन म्हणालेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने काबूलवर कब्जा केल्यानंतर अमेरिका त्यांच्या नागरिकांबरोबरच इतरांनाही सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी मदत कार्य सुरु केलं आहे. हे काम ३१ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. एक हजार अमेरिकन नागरिक आणि शेकडोच्या संख्येने अफगाणि नागरिक देशाबाहेर पडण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत. देशाबाहेर पलायनासाठी काबूल विमानतळावर हजारोंनी गर्दी केली आहे. या गजबजलेल्या विमानतळाच्या प्रवेशद्वारावर एक आणि विमानतळाबाहेरील एका हॉटेलजवळ एक असे दोन आत्मघाती स्फोट झाले. स्फोटांमुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला.

नक्की पाहा >> प्रेस कॉन्फरन्स झाली तालिबानची अन् ट्रोल होतायत मोदी; जाणून घ्या नक्की प्रकरण काय?

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्वप्रथम स्फोटांतील मृत आणि जखमींबाबत माहिती दिली. या स्फोटांत १२ अमेरिकी कर्मचारी ठार झाल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अफगाणिस्तानातील आयसिस संलग्न संघटनेने (आयसिस-के) हा हल्ला केल्याचा संशय आहे. तालिबानने या हल्ल्याचा निषेध केला. अमेरिकी सैन्याच्या नियंत्रणाखालील भागात हा हल्ला झाल्याचे तालिबानने म्हटले आहे.

अफगाणिस्तानातील आपापल्या देशांच्या नागरिकांना सुखरूप परत आणण्याची अनेक देशांची मोहीम काबूल विमानतळावर अंतिम टप्प्यात आहे. या बचाव मोहिमेदरम्यान अमेरिकेसह मित्रराष्ट्रांच्या सैन्यावर हल्ला न करण्याची ग्वाही तालिबानने दिली होती. अमेरिकेने जाहीर केल्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत सर्व परदेशी सैन्य माघारी गेले पाहिजे, अशी भूमिका तालिबानने घेतली आहे.

अफगाणिस्तानातून पलायनासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झालेल्या काबूल विमानतळावर आत्मघाती बॉम्बहल्ल्याची भीती अमेरिका, ब्रिटनसह अन्य देशांनी आधीच व्यक्त केली होती. अमेरिकी दूतावासाने बुधवारी रात्री काबूल विमानतळाच्या तीन प्रवेशद्वारांजवळ न थांबण्याची सूचना आपल्या नागरिकांना केली होती. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि न्यूझीलंडनेही आपल्या नागरिकांना विमानतळावर न जाण्याचे आवाहन केले होते. अखेर या देशांची भीती खरी ठरली.