अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. अमेरिका आणि माझा पक्ष यांच्या हिताच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला आहे असं बायडेन यांनी स्पष्ट केलं.
चार महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्याबरोबरच्या डिबेटदरम्यानही बायडेन यांना आपली भूमिका ठोसपणे मांडता आली नव्हती. काही दिवसांपूर्वी बायडेन यांना करोना संसर्ग झाला होता. या संसर्गामुळे श्वसनाचा त्रासही सुरू झाला होता. गेल्या काही महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विस्मरण झाल्याचेही दिसलं होतं. गेल्या काही दिवसात डेमोक्रॅट्स पक्षातूनच बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी असे प्रयत्न सुरू होते. या सगळ्याची परिणती बायडेन यांच्या घोषणेत झाली.
सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून बायडेन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘अमेरिकेसारख्या बलशाही देशाचं राष्ट्राध्यक्षपद भूषवणं हा सर्वोच्च सन्मानाचा क्षण आहे असं बायडेन यांनी म्हटलं आहे. पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येण्याची माझी इच्छा आणि तयारी होती पण देशाचं आणि डेमोक्रॅट्स पक्षाचं हित लक्षात घेऊन मी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष या नात्याने उर्वरित कार्यकाळात माझ्या कर्तव्यांना पूर्णत:न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल. यासंदर्भात काही दिवसातच देशवासीयांना संबोधित करेन’, असं बायडेन यांनी म्हटलं आहे.
बायडेन यांनी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभार मानले आहेत. त्या एक सक्षम सहकारी आहेत अशा शब्दात बायडेन यांनी हॅरिस यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
बायडेन यांनी आपल्या पत्रकात लिहिलं की, ‘गेल्या तीन साडेतीन वर्षात एक देश म्हणून आपण प्रगतीपथावर आहोत. सध्याच्या घडीला अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातली भक्कम अशी आहे. देशाची पुनर्उभारणी करण्याच्या दृष्टीने आपण ऐतिहासिक गुंतवणूक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी औषधांच्या किमती कमी करणं, अमेरिकेच्या नागरिकांना सर्वोत्तम दर्जाची आरोग्य सेवा पुरवणं यासाठी आपण कटिबद्ध आहोत. घातक गोष्टींचा सामना करणाऱ्या ज्येष्ठांना आपण अतिशय त्वरेने सर्वोत्तम अशी मदत पुरवली आहे. ३० वर्षात पहिल्यांदाच शस्त्र सुरक्षा कायदा पारित केला. सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच आफ्रो-अमेरिकन वंशाच्या विधिज्ज्ञांची नियुक्ती झाली. हवामान बदलाला सामोरं जाण्याकरता जगात पहिल्यांदाच अशा नियमांची तरतूद केली. अमेरिका जगाचं नेतृत्व करण्यासाठी यापेक्षा सक्षम स्थितीत कधीच नव्हता’.
हेही वाचा – जो बायडेन यांची अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतून माघार… पुढे काय होणार?…
ते पुढे लिहितात, ‘मला कल्पना आहे यापैकी काहीही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हतं. एकमेकांना साथ देत आपण करोनासारख्या अभूतपूर्व संकटाचा सामना केला. त्यानंतर उद्भवलेल्या आर्थिक मंदीला आपण एकमेकांच्या साथीने सामोरे गेलो. आपण आपल्या लोकशाहीचं प्राणपणाने जतन केलं. याच्या बरोबरीने जगभरातल्या आपल्या मित्रराष्ट्रांशी संबंध दृढ केले’.
‘अमेरिकासारख्या महान देशाचं प्रमुखपद मला भूषवायला मिळाला हा माझा सर्वोच्च सन्मान आहे. पुन्हा या पदी निवडून येण्यासाठी मी प्रयत्नशील होतो पण देशाचं आणि पक्षाचं हित घेऊन मी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून उर्वरित कार्यकाळात कर्तव्यं निष्ठेने पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्या निर्णयासंदर्भात देशवासीयांशी लवकरच संवाद साधेन’, असं बायडेन यांनी म्हटलं आहे.
‘मी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून यावं यासाठी असंख्य लोकांनी अथक प्रयत्न केले. त्या सगळ्यांप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे मी आभार मानू इच्छितो. त्यांनी मला खंबीरपणे साथ दिली. तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलात आणि पाठिंबा दिलात त्यासाठी मनापासून आभार मानतो. जेव्हा आपण सगळे एकत्र असतो तेव्हा अमेरिकेला काहीच अप्राप्य नाही असं मला वाटतं. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या देशाचे आपण नागरिक आहोत हे आपण लक्षात ठेवायला हवं’, असं बायडेन यांनी म्हटलं आहे.