जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरामध्ये एका पाचमजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये किमान ७३ जणांचा मृत्यू झाला आणि अन्य ५२ जण जखमी झाले. जास्त करून स्थलांतरित राहत असलेल्या या इमारतीला गुरुवारी आग लागली. ही आग कशामुळे लागली ते अद्याप समजू शकले नाही अशी माहिती आपत्कलीन सेवेचे प्रवक्ते रॉबर्ट मुलौड्झी यांनी दिली.

हेही वाचा >>> Amazon च्या मॅनेजरच्या हत्येमागे ‘माया गँग’, १८ वर्षांचा मुलगा चालवतो ही टोळी

गुरुवारी १.३० वाजता जोहान्सबर्गमधील डेल्व्हर्स आणि अल्बर्ट्स स्ट्रीट्सच्या कोपऱ्यावर असलेल्या या इमारतीला आग लागल्याची माहिती आपत्कालीन सेवेला मिळाली, त्यानंतर आग विझवण्याचे काम सुरू झाले. आपत्कालीन सेवेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास प्राधान्य देण्यात आले. बहुसंख्य जखमींच्या नाकातोंडात धूर गेला तसेच त्यांना किरकोळ जखमा झाल्या असे सांगण्यात आले. अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश आले असून या आगीमध्ये संपूर्ण इमारत जळाली आहे. प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत बेघर झालेल्यांसाठी निवारा शोधण्यास प्राधान्य दिले जात आहे.