अंदमानातील नॉर्थ सेंटिनेल बेटावर आदिवासी समाजाच्या हल्ल्यात मरण पावलेल्या अमेरिकन पर्यटकाचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही. जॉन अॅलेन असे या पर्यटकाचे नाव असून सेंटिनेली आदिवासी जमातीने त्याची हत्या केली. जॉन अॅलेनच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. अंदमानमधील नॉर्थ सेंटिनेल बेटावर पर्यटकांना प्रवेशबंदी आहे. पण अॅलेन सात मच्छीमारांच्या मदतीने कुतूहलापोटी या बेटावर गेला होता.
जॉन अॅलेन १६ ऑक्टोंबरला अंदमानमध्ये दाखल झाला होता. १४ नोव्हेंबरला तो या बेटावरील जंगलात गेला. त्यावेळी त्याला तिथे घेऊन गेलेले सात मच्छीमार मात्र त्याच्यासोबत आत गेले नाहीत. सेंटिनेली आदिवासींनी बाण मारुन जॉन अॅलेनची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे दफन केले अशी माहिती स्थानिक मच्छीमाराने दिल्याचे पोलीस अधिकारी दीपक यादव यांनी सांगितले. सेंटिनेली आदिवासींचे हजारो वर्षांपासून या बेटावर वास्तव्य आहे. चुकूनही कोणी इथे जाऊ नये यासाठी तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाची नेहमीच या भागात गस्त सुरु असते.
Andaman & Nicobar Police: John Allen Chau, a citizen of the United States of America (USA), who came to Port Blair on Oct16, allegedly killed by tribesmen at North Sentinel Island. Body yet not recovered; search operation is still on. Case registered; seven accused arrested.
— ANI (@ANI) November 21, 2018
जॉन अॅलेनचा मृतदेह मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हवाई पाहणी सुद्धा करण्यात आली असे दीपक यादव यांनी सांगितले. जॉन अॅलेनचा मृतदेह शोधण्यात मुख्य अडचण ही आहे की, बाहेरच्या कुठल्याही माणसाने त्यांच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर सेंटिनेली आदिवासी हल्ला चढवतात. एकदा त्यांची आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी एक हेलिकॉप्टर तिथे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्या हेलिकॉप्टरच्या दिशेने सुद्धा बाण मारले होते.
सेंटिनेली ही अंदमान-निकोबार द्वीपकल्पातील एक जमात आहे. त्यांचा अन्य लोकांशी संपर्क नाही. पोर्टब्लेअरच्या पश्चिमेला ६४ किमीवर असलेल्या नॉर्थ सेंटिनेल बेटावर त्यांचे वास्तव्य आहे. सेंटिनेली आदिवासींच्या कोणी जवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष अटळ असतो.
सेंटिनली जमातीविषयी…
नॉर्थ सेंटिनेल बेटावर सेंटिनेली आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. त्यांची लोकसंख्या १०० (२०११) असून इतर नेग्रिटी वंशाच्या लोकांप्रमाणेच ते इतिहासपूर्व काळात येथे येऊन स्थायिक झाले असावेत. ते स्वत:ची सेंटिनेलिज बोलीभाषा बोलतात. या जमातीतले पुरुष एक वैशिष्ट्यपूर्ण सालीचा कमरपट्टा वापरतात. ते कृष्णवर्णीय, मध्यम उंचीचे व नेग्रिटो वंशीय बांध्याचे आहेत. ही जंगलातील कंदमुळे गोळा करणारी शिकारी निमभटकी जमात असून ते रानडुक्कर, समुद्री कासव, मासे इत्यादींची शिकार धनुष्यबाण तसंच भाल्याने करतात. मच्छीमारीसाठी आणि समुद्री कासव पकडण्यासाठी ते होडीचा उलंडी मचवा (डोंगी होड्या) वापर करतात. डुकराचे मांस, समुद्र कासवे, भिन्न प्रकारची मच्छी, फळे, कंदमुळे हे त्यांचे अन्न असते. त्यांचा १८५८ मध्ये ब्रिटिश वसाहतवाल्यांशी संघर्ष झाला. अखेर त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे ब्रिटिशांनी या प्रदेशातून काढता पाय घेतला होता. या आदिवासी जमातीचा अन्य लोकांशी संपर्क नाही. त्यामुळे कोणी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष उद्भवतो.