अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांची अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी आज भेट घेतली. करजाई यांनी अलीकडेच केलेल्या अमेरिका विरोधी वक्तव्यानंतर अफगाणिस्तान व अमेरिका यांच्यात कुठलाही दुरावा निर्माण झाला नसल्याचे दाखवण्याचा उद्देश त्यामागे होता. केरी यांनी अमेरिकी दूतावासातील अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.
अमेरिकेच्या पाठिंब्याने सुरू करण्यात आलेल्या महिला उद्योजकता कार्यक्रमातील सहभागी महिलांचीही त्यांनी भेट घेतली, त्याचबरोबर अफगाणिस्तानमध्ये २०१४ च्या निवडणुकांची तयारी करणाऱ्या स्थानिक अधिकाऱ्यांशीही त्यांनी सल्लामसलत केली.
तत्पूर्वी आज आठ आत्मघाती बॉम्बरनी पोलीस मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात जलालाबाद येथे पाच अधिकारी ठार झाले तर इतर चार जण जखमी झाले. तालिबानचे प्रवक्ते झबीउल्ला मुजाहिद यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. केरी यांचे काल काबूल येथे आगमन झाले. करजाई यांच्या वक्तव्याने दहशतवाद विरोधी लढय़ातील प्रगतीत अडथळा येईल अशी चिंता व्यक्त केली जात होती. करझाई हे या महिन्यात अमेरिकी अधिकाऱ्यांवर संतप्त झाले होते व अफगाणिस्तानला कमकुवत ठेवण्यासाठी अफगाणी तालिबान्यांशी साटेलोटे करीत असल्याचा आरोप केला होता. ओबामा प्रशासन लवकरच अफगाणिस्तानची सुरक्षा तेथील सैन्य दलांच्या हाती सोपवण्याची योजना आखत असतानाच करजाई यांच्या विधानामुळे विसंवाद निर्माण झाला होता.
खासगी बैठकीनंतर केरी यांनी सांगितले की, करजाई यांना आपण त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली व त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर आपण समाधानी आहोत. आंतरराष्ट्रीय दले २०१४ मध्ये अफगाणिस्तानातील मोहीम संपवणार असून दोन्ही देशांचे असलेले उद्देश हे अफगाणिस्तानात शांतता निर्माण करणे हेच आहेत.
करजाई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, आपण केलेल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास करण्यात आला. केरी यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता, पण काहीवेळा आपण जाहीरपणे जे बोलतो त्यात इतरांच्या कल्पनांचे प्रतिबिंब असते व त्याच्याशी आपण सहमत असतोच असे नाही.
केरी यांनी सांगितले की, तालिबानला शांतता बोलण्यांच्या पातळीवर आणणे हेच अमेरिकेचे उद्दिष्ट आहे. तेथील लोकांच्या संरक्षणाबाबत आपण सरकारच्या सहकार्याबाबत समाधानी आहोत.
तालिबानला खरेच अमेरिकी सैन्य देशातून जावे असे वाटत असेल तर त्यांनी लोकांना ठार मारणे थांबवावे असे वक्तव्य आपण केले होते, असे करजाई यांनी सांगितले.
अमेरिकाविरोधी विधानाबाबतचे करझाई यांचे स्पष्टीकरण केरी यांना मान्य
अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांची अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी आज भेट घेतली. करजाई यांनी अलीकडेच केलेल्या अमेरिका विरोधी वक्तव्यानंतर अफगाणिस्तान व अमेरिका यांच्यात कुठलाही दुरावा निर्माण झाला नसल्याचे दाखवण्याचा उद्देश त्यामागे होता.
First published on: 28-03-2013 at 02:38 IST
TOPICSजॉन केरी
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: John kerry agree on explanation of karzai regarding anti american statement