भारतासोबतचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी रविवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात केरी दोन्ही देशांमधील महत्त्वाच्या क्षेत्रांमधील संबंधांबाबत चर्चा करणार आहेत. वेगाने विस्तारणाऱ्या भारताच्या ऊर्जा क्षेत्रात १०० दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा अमेरिकेने केली आहे.
परराष्ट्रमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच ६९ वर्षीय केरी भारत भेटीवर आले असून, त्याच्यासमवेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ रविवारी दिल्लीत दाखल झाले. केरी यांच्या शिष्टमंडळात अमेरिकेचे ऊर्जा सचिव, नासाचे संचालक, पॅसिफिक विभागाचे अमेरिकेचे लष्करप्रमुख अ‍ॅडमिरल सॅम्युअल लॉकलियर आणि इतर विभागांशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या दौऱ्यात केरी भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार, संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्यासह ऊर्जा आणि उच्च शिक्षण आदी क्षेत्रात भरीव सहकार्य करण्याच्या मुद्दय़ावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय इंटरनेट टेहळणी, एच१बी आणि एल व्हिसा तसेच ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आदी मुद्दय़ांवरही या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Story img Loader