अमेरिकेची औषध कंपनी जॉनसन अँड जॉनसननं भारतात सरकारकडे लस मंजुरीचा प्रस्ताव ठेवला आहे. या लसीचा एक डोस प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. सरकारने या लसीला मंजुरी दिल्यास भारतात करोना विरुद्धच्या लढाईसाठी चौथी लस उपलब्ध होणार आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे डोस दिले जात आहेत. या तिन्ही लसींचे दोन डोस दिले जात आहेत. आतापर्यंत या लसींच्या माध्यमातून ४९.५३ कोटी नागरिकांचं लसीकरण केलं गेलं आहे. जर जॉनसन अँड जॉनसन लसीला मंजुरी मिळाली, तर सिंगल डोस असलेली पहिली लस ठरेल.

जॉनसन अँड जॉनसन लसीला मंजुरी मिळाल्यास देशातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. कमी वेळात मोठ्या प्रमाणात लसीकरण होणार आहे. करोनावर जॉनसन अँड जॉनसनची लस ८५ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. तसेच साउथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

आरोग्य मंत्रालयामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशात अ‍ॅक्टीव्ह रूग्णसंख्या ४,१४,१५९ असून, एकूण ३,१०,१५,८४४ रूग्ण करोनातून बरे झालेले आहेत. तसेच, ४९,५३,२७,५९५ जणांचे लसीकरण झालेले आहे. करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील करोना रुग्णांची संख्या २० कोटी पार करेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक करोना अपडेटमध्ये म्हटलंय. जागतिक स्तरावर १३२ देशांमध्ये बीटा व्हेरिएंट आणि ८१ देशांमध्ये गामा व्हेरिएंटची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. तर, अल्फा व्हेरिएंट १८२ देशांमध्ये पसरला आहे. दरम्यान, २६ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ४० लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असेही अपडेटमध्ये म्हटले आहे.

Story img Loader