बस्तर भागात केंद्रीय दले व राज्य पोलीस हे येत्या काही दिवसात संयुक्तपणे नक्षलविरोधी मोहीम राबवतील असे सूतोवाच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे केले.
२५ मे रोजी बस्तर भागात झालेल्या भयानक नक्षलवादी हल्ल्यानंतर शिंदे यांनी आज छत्तीसगडमध्ये भेट देऊन नक्षलविरोधी मोहिमेचा आढावा घेतला. मुख्यमंत्री रमणसिंग व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी राजभवन येथे बैठक घेतली.  दक्षिण बस्तर भागात २५ मे रोजी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या नक्षली हल्ल्यात २५ ठार व २७ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नंदकुमार पटेल व ज्येष्ठ नेते महेंद्र कर्मा यांचा समावेश आहे.
हल्ल्याच्या घटनेबाबत चर्चेनंतर आम्ही नक्षलवाद्यांच्या विरोधात संयुक्त मोहीम राबवण्याचे ठरवले आहे असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी आम्ही केंद्र सरकारकडे पाठिंब्याशिवाय काही मागणार नाही असे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी आपल्याला सांगितले असून केंद्रीय दले राज्याच्या पोलिसांना नक्षलविरोधी मोहिमेत मदत करतील असे ते म्हणाले.
सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले की, प्रत्येक नक्षलग्रस्त राज्याने नक्षलवाद्यांच्या मुकाबल्यासाठी आंध्रच्या धर्तीवर ग्रेहाऊंड दले स्थापन करावीत, त्यात केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करील. केंद्रीय गृह राज्यमंत्री नानकिराम कंवर, गृहसचिव आर.के.सिंग व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक प्रणय सहाय, छत्तीसगडचे पोलीस महासंचालक रामनिवास यावेळी बैठकीस उपस्थित होते.

Story img Loader