Opposition Leaders Meeting : भाजपाविरोधी एक्य दर्शवण्याकरता संयुक्त विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या बैठकीत देशभरातील २० हून जास्त विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहिले होते. ही बैठक संपल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसंच, पुढची बैठक शिमल्यात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“ही अत्यंत चांगली बैठक झाली. सर्वांनी एकत्र चालण्याची सहमती दर्शवली आहे. येत्या काळात सर्व पक्षीयांची आणखी एक बैठक होणार आहे. पुढच्या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे. एकत्र निवडणूक लढवण्याची सहमती आजच्या बैठकीत झाली आहे”, असं नितीश कुमार म्हणाले.
हेही वाचा >> विरोधकांची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमच्यात मतभेद…”
“पुढच्या बैठकीत अंतिम रुप घेतलं जाईल. कोण कुठून लढवणार हे या बैठकीत ठरवलं जाईल. सध्या जे शासनमध्ये आहेत ते देशहिताचं काम करत नाहीयत. ते देशाचा इतिहास बदलायला निघाले आहेत. स्वातंत्र्यांच्या लढाईलाही ते विसरतील. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधक एकजूट राहणार आहेत. राज्यातील सरकारवरून आव्हाने निर्माण झाली तर सर्व एकत्र राहणार आहेत”, असंही नितीश कुमार म्हणाले.
प्रत्येक राज्याचा विचार केला जाई – मल्लिकार्जुन खरगे
“सर्व नेते भेटले. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सर्व नेते आले आहेत. सर्व नेत्यांनी एक होऊन पुढे निवडणूक लढण्यासाठी एक कॉमन अजेंडा तयार करत आहोत. १० किंवा १२ जुलै रोजी शिमल्यामध्ये पुढची बैठक होणार आहे. या बैठकीत अजेडा तयार केला जाईल. कोणत्या मुद्द्यांवर निर्णय घेतला जाईल, पुढे कसं चाललं पाहिजे. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. कारण एकाच मुद्द्यावर प्रत्येक राज्यात चालून नाही चालणार. बिहार, तामिळनाडू, काश्मीर, महाराष्ट्रात काय करणं गरेजंच आहे याबाबत स्ट्रॅटेजी तयार केली जाईल. एकजूट होऊन २०२४ ची लढाई आपल्याला लढायची आहे. राहुल गांधींनी जिथे जिथे यात्रा केली, तेथील नेते आज आले आहेत”, असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
हेही वाचा >> Photos : “पाटण्यातून सुरू होणारं जनआंदोलन बनतं”, विरोधकांच्या ऐक्याला बिहारमधून बळकटी; कोण काय म्हणालं वाचा!
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दला (युनायटेड) नेते नितीश कुमार यांनी आज पाटणा येथे विरोधकांची बैठक बोलावली होती. भाजपाविरोधी नेत्यांना एकत्र आणून आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत, युवानेते आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आदी नेतेमंडळी या बैठकीला उपस्थित होते.
…म्हणून आम्ही लवचिकतेचे धोरण स्वीकारले- राहुल गांधी
राहुल गांधी यांनीदेखील देशातील स्वायत्त संस्थांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. “ही विचारांची लढाई आहे. आमच्यात नक्कीच काही मतभेद आहेत. मात्र विचारधारा जपण्यासाठी आम्ही काही ठिकाणी लवचिकतेचे धोरण स्वीकारले आहे. एकत्र येण्यासाठीची ही एक प्रक्रिया आहे. ती चालत राहणार आहे,” असे राहुल गांधी म्हणाले.