पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांनी इम्रान खान सरकारची पोलखोल केलीय. २००७ मध्ये जनरल परवेज मुशर्रफ यांनी माझ्यावर घातलेल्या बंदीला विरोध करणारे इम्रान खान स्वतः पंतप्रधान झाल्यावरही मागील ४ महिन्यांपासून माझ्यावर बंदी आहे. तरीही इम्रान खान पाकिस्तानमध्ये माध्यम स्वातंत्र्य असल्याचं अनेकदा बोलतात, असं मत हमीद मीर यांनी व्यक्त केलंय.

हमीद मीर म्हणाले, “माझ्यावर २००७ मध्येही जनरल परवेज मुशर्रफ यांनी ४ महिन्यांची बंदी घातली होती. तेव्हा इम्रान खान यांनी मला पाठिंबा दिला होता. आता स्वतः इम्रान खान पंतप्रधान आहेत आणि माझ्यावर मागील ४ महिन्यांपासून बंदी आहे. असं असताना पंतप्रधान इम्रान खान मागील ४ महिन्यात इम्रान खान पाकिस्तानमध्ये माध्यमं स्वतंत्र असल्याचं अनेकदा बोललेत.”

“२००७ मध्ये टीव्हीवर कार्यक्रम करण्यासाठी माझ्यावर बंदी घातल्यानंतर मी रस्त्यावर उतरुन लोकांमध्ये जात कार्यक्रम घेतले. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते इम्रान खान या कार्यक्रमांमध्ये पाहुणे म्हणून हजर राहिले. तेव्हा त्यांनी पाकिस्तानमध्ये स्वतंत्र माध्यमांचं आश्वासन दिलं होतं,” असंही हमीद मीर यांनी नमूद केलंय.

पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांच्यावर इम्रान सरकारने बंदी का घातली?

पाकिस्तानमध्ये मे २०२१ मध्ये असद अली तूर या पत्रकारावर इस्लामाबादमधील त्याच्या राहत्या घराजवळ ३ जणांनी जीवघेणा हल्ला केला. यानंतर पाकिस्तानमधील पत्रकारांनी या हल्ल्याविरोधात निषेध सभा आयोजित केली. या सभेला पत्रकार हमीद मीरही हजर राहिले. यावेळी केलेल्या आपल्या भाषणात हमीद मीर यांनी हल्ला होऊन अनेक दिवस उलटले मात्र कोणताही कारवाई न झाल्यानं जोरदार टीका केली. हे हल्लेखोर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे असल्याचाही आरोप झाला. यावरुन मीर यांनी पाकिस्तानी सैन्यावरही सडकून टीका केली. यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या दबावातून लगेचच मीर यांच्या टेलिव्हीजन कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली.

हमीद मीर कोण आहेत?

हमीद मीर पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार आहेत. ते जीओ टीव्हीवर लोकप्रिय ठरलेल्या ‘कॅपिटल टॉक’ हा कार्यक्रम घ्यायचे. या कार्यक्रमात ते वेगवेगळ्या विषयांवर पत्रकार, अभ्यासकांना बोलावून चर्चा घडवून आणायचे. या कार्यक्रमातही त्यांनी माध्यम स्वातंत्र्यावरुन पाकिस्तानच्या सैन्यावर अनेकदा टीका केलीय. मीर यांच्यावर २०१४ मध्ये कराचीत जीवघेणा हल्ला झाला होता. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेवर हल्ला घडवून आणल्याचे गंभीर आरोप केले होते. या हल्ल्यामागील आरोपी अद्यापही समोर आलेले नाहीत. २०१२ मध्येही त्यांच्या गाडीत स्फोटकं ठेवण्यात आली होती. त्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानने घेतली होती.

पाकिस्तानमध्ये पत्रकारांवर अनेक हल्ले

स्थानिक पत्रकारांनी केलेल्या दस्तावेजीकरणानुसार, मे २०२० ते एप्रिल २०२१ या काळात पत्रकारांवर अशाप्रकारचे १४८ हल्ले झालेत. दुसरीकडे इम्रान सरकार मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानमध्ये माध्यमांना स्वातंत्र्य असल्याचा दावा करत आहे. यावरुनच पाकिस्तानच्या दुटप्पीपणावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आता पाकिस्तानमधील पत्रकारांनीच टीका केल्यानं या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलंय.

अफगाणिस्तानमध्ये ढवळाढवळ करणाऱ्या इम्रान खान यांना तालिबानकडून धमकीवजा इशारा; म्हणाले, “ज्यांना आमच्या…”

Story img Loader