अमेरिकी-अरबी पत्रकार जमाल खशोगी यांच्या मृत्यूचा खुलासा होण्याची शक्यता आहे. कारण, काही आंतरराष्ट्रीय माध्यमांतील वृत्तानुसार, सौदी अरेबियाचे सरकार एक असा अहवाल तयार करीत आहे. ज्यामध्ये सौदीकडूनच चौकशीदरम्यान खशोगी यांचा मृत्यू झाल्याचे अमेरिकेसमोर ते मान्य करु शकतात. मात्र, जर याबाबत सौदीकडून योग्य माहिती देण्यात आली नाही तर सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते.
अमेरिकेत वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगी बेपत्ता झाले आहेत. तुर्कीची राजधानी इस्तंबुलमध्ये असणाऱ्या सौदी अरेबियाच्या वाणिज्य दुतावासात खशोगींची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे जगभरात तसेच विशेषतः अमेरिकेमध्ये तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे. कारण औदी अरेबिया वंशाचे असणारे खशोगी हे अमेरिकेचे अधिकृत कायम नागरिक होते आणि वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार होते.
या प्रकरणावरुन चिडलेल्या अमेरिकेच्या खासदारांनी सौदी अरेबियासोबतचे व्यावसायिक संबंध तोडून ११० अब्ज अमेरिकन डॉलरचा मोठा संरक्षण करार रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी, सीईओंनी तसेच माध्यमांनी सौदी अरेबियात होणाऱ्या एका वित्तीय संमेलनात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सौदी अरेबियाचे राजे सलमान यांच्यासोबत या प्रकरणावरुन चर्चा केली. त्यावर प्रतिक्रिया देताना बेपत्ता पत्रकार खशोगी यांच्याबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे राजे सलमान यांनी म्हटले आहे. सौदी अरेबियाचे म्हणणे आहे की, खशोगी आमच्या दुतावासातून निघून गेले होते. मात्र, याबाबत त्यांनी अद्याप कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला गंभीर परिणामांना समोरे जावे लागण्याचा इशारा दिला आहे. तसेच सौदीच्या नेत्याशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेने परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांना पाठवले आहे.
जगभरातून या प्रकरणावर टीका होत असताना सीएनएनने सोमवारी वृत्त दिले की, सौदी अरेबिया एक अहवाल तयार करीत आहे. ज्यामध्ये हे स्विकारण्यात येऊ शकते की, खशोगींचा मृत्यू चौकशीदरम्यान झाला आहे. दोन अज्ञात सुत्रांच्या हवाल्याने सीएनएनने हे वृत्त दिले आहे.