मणिपुरी अभिनेत्री मोमोको हिचा विनयभंग केल्याप्रकरणी नागा बंडखोराला अटक करण्याच्या मागणीप्रित्यर्थ पुकारण्यात आलेल्या ‘मणिपूर बंद’ला रविवारी हिंसक वळण लागले. पोलिसांनी हिंसाचार रोखण्यासाठी केलेल्या गोळीबारात एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा मृत्यू झाला.
१८ डिसेंबर रोजी मोमोको हिचा एका सांगीतिक कार्यक्रमादरम्यान नागा बंडखोर दहशतवादी लिव्हिंगस्टन अॅनल याने सार्वजनिक ठिकाणी विनयभंग केला होता. तेव्हापासून येथे हे प्रकरण पेटले आहे. मणिपूर चित्रपट संघटनेने अॅनल याला तातडीने अटक करण्याची मागणी करत राज्यात बंद पुकारला आहे. बंदच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पूर्व व पश्चिम इम्फाळ जिल्ह्य़ातील थंगमेइबंद या गावात आंदोलकांनी संचारबंदीचा आदेश तोडून पोलिसांच्या गाडय़ा जाळल्या तसेच पोलिसांवर दगडफेकही केली. या गावातील ‘प्राइम टाइम’ या स्थानिक वृत्तवाहिनीचा पत्रकार थंगजम नानाओ सिंग हा या प्रकाराचे वार्ताकन करत असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याला थातीत गोळी लागली. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
या प्रकारानंतर पूर्व व पश्चिम इम्फाळ जिल्ह्य़ात १६ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री गैखंगम यांनी रुग्णालयात जाऊन नानाओ सिंगच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तसेच आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2012 रोजी प्रकाशित
मणिपूरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात पत्रकार ठार
मणिपुरी अभिनेत्री मोमोको हिचा विनयभंग केल्याप्रकरणी नागा बंडखोराला अटक करण्याच्या मागणीप्रित्यर्थ पुकारण्यात आलेल्या ‘मणिपूर बंद’ला रविवारी हिंसक वळण लागले. पोलिसांनी हिंसाचार रोखण्यासाठी केलेल्या गोळीबारात एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा मृत्यू झाला.

First published on: 24-12-2012 at 03:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalist killed in police firing curfew reimposed