Journalist killed in UP Crime News : उत्तर प्रदेशमध्ये एका स्थानिक पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. लखनऊ-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर सीतापूर येथे शनिवारी ही घटना घडली. पीडित राघवेंद्र बाजपेयी हे येथील हिंदी दैनिकाचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी पहिल्यांदा त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. पहिल्यांदा हा अपघात असल्याचे वाटले मात्र नंतर डॉक्टरांना बाजपेयी यांच्या शरीरावर तीन गोळ्या लागल्याच्या जखमा आढळून आल्या त्यानंतर ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले.

३५ वर्षीय पत्रकार बाजपेयी हे शनिवारी दुपारी त्यांना एक फोन आल्यानंतर घराबाहेर पडले होते. त्यानंतर काही वेळातच, दुपारी ३:१५ वाजता महामार्गावर त्यांची हत्या करण्यात आली.

पोलिसांना अद्याप त्यांच्या हत्येचे कारण समजू शकलेले नाही. तसेच या अद्याप प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आला नाही. प्रशासनाकडून पीडित व्यक्तीच्या कुटुंबाकडून औपचारिक तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार आहेत.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोपींना पकडण्यासाठी चार टीम तयार करण्यात आल्या आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची ओळख पटविण्यासाठी महोली, इमालिया आणि कोतवाली येथील पोलिस पथके, सर्व्हेलन्स आणि एसओजी टीम तैनात करण्यात आल्या आहेत.”

Story img Loader