देशभक्तीच्या मुद्द्यावरून पत्रकार राजदीप सरदेसाई आणि अभिनेता अनुपम खेर यांच्यात गेल्या काही दिवसांत ट्विटरयुद्ध रंगलेले आहे. शिवसेनेच्या दांभिकतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राजदीप देसाई यांच्या ट्विटला अनुपम खेर यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर या सगळ्या वादाला सुरूवात झाली. काश्मिरी पंडितांच्या दुरावस्थेच्या मुद्द्यावर बोलताना राजदीप यांची देशभक्ती कुठे जाते, असा थेट सवाल अनुपम खेर यांनी उपस्थित केला. तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तुम्ही इतक्या असंवेदनशीलप्रकारे व्यक्त होता, हे दुर्देवाचे आहे. गेल्या काही वर्षातील काश्मिरी पंडितांच्या सामुहिक हत्या आणि त्यांच्या स्थलांतराबाबत तुम्ही कोणत्याप्रकराची देशभक्ती दाखविली?. मात्र, याबाबत तुझ्याशी बोलून काही फायदा आहे का, हे म्हणजे झोपेचे सोंग घेतलेल्या व्यक्तीला उठवण्यासारखे असल्याचा टोला अनुपम खेर यांनी राजदीप यांना लगावला.

त्यानंतर अनुपम खेर यांनी राजदीप सरदेसाई यांच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेतही भाग घेतला होता. सुधींद्र कुलकर्णी यांच्यावरील हल्ला आणि देशातील असहिष्णु वातावरणाचा निषेध म्हणून लेखकांनी परत केलेले साहित्य अकादमीचे पुरस्काराच्या मुद्दयावर ही चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राजदीप सरदेसाई यांनी खेर यांना तुम्ही प्रसारमाध्यमांना लक्ष्य का करता, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले की, राजदीप तुम्ही टीका करताना फक्त निवडक गोष्टींना लक्ष्य करता. तुम्हाला सरकार आणि मोदींविषयी समस्या आहेत. मी त्या पाहू आणि समजू शकतो. यावेळी खेर यांनी काही दिवसांपूर्वी राजदीप यांनी ट्विटवरून डिलीट केलेल्या ट्विटसचा दाखला दिला. हे ट्विटस अनुपम खेर यांच्यावर टिप्पणी करणारे होते. दरम्यान, खेऱ यांनी या ट्विटसचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राजदीप यांनी आपण खेर यांच्यासंदर्भात केलेले ट्विटस वैयक्तिक आणि अयोग्य असल्याचे सांगत ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली. या सगळ्यातून मला धडा मिळाला आहे, इथून पुढे मी कमी प्रमाणात ट्विट करेन, असेही राजदीप यांनी म्हटले.