बिहारच्या अररिया जिल्ह्यात असलेल्या राणीगंज भागात एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका वृत्तपत्रात काम करणाऱ्या विमल यादव नावाच्या पत्रकाराची काही लोकांनी घराबाहेर बोलवून हत्या केली. विमल यादव हे त्यांच्या घरात होते, त्यांना बहाण्याने बाहेर बोलवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. विमल यादव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केली चिंता
या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे असे आदेशही दिले आहेत. एखाद्या पत्रकाराला अशा प्रकारे मारणं ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाची चौकशी आम्ही करत आहोत आणि लवकरच दोषींना शिक्षा दिली जाईल.
विमल यादव हे भावाच्या हत्या प्रकरणातले मुख्य साक्षीदार
दोन वर्षांपूर्वी विमल यादव यांच्या भावाची काही गुंडांनी हत्या केली. विमल यादव हे या हत्या प्रकरणातले प्रमुख साक्षीदार होते. त्यांनी साक्ष देऊ नये म्हणून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली अशीही शंका उपस्थित होते आहे. कारण विमल कुमार यांना धमक्या येत होत्या.
बिहार पोलिसांनी या प्रकरणी एक ट्वीट केलं आहे. हल्लेखोरांनी पहाटे ५.३० च्या दरम्यान यादव यांच्या घराचा दरवाजा वाजवला. त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या घटनेत विमल यादव यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करत आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांची आणि श्वान पथकाची मदतही आम्ही घेणार आहोत असं पोलीस अधीक्षक अशोक कुमार सिंह यांनी सांगितलं. या प्रकरणी आम्ही सगळै पैलू तपासून पाहात आहोत. दैनिक जागरण या वृत्तपत्रात विमल यादव काम करत होते असंही पोलिसांनी म्हटलं आहे.