इंडियन एक्स्प्रेसच्या पत्रकार तवलीन सिंग यांनी गेल्या आठवड्यातील दोन घटनांचा उल्लेख करत एक भारतीय असल्याची लाज वाटत असल्याची खंत व्यक्त केली आहे. निर्भीड व सडेतोड लिखाणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या तवलीन यांनी सलमान रश्दींवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय नेत्यांनी बाळगलेलं मौन व बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्या ११ नराधमांची गुजरात सरकारनं केलेली सुटका या दोन अस्वस्थ करणाऱ्या लाजिरवाण्या घटना असल्याचं म्हटलं आहे.
तवलीन म्हणतात, “माथेफिरू मुस्लीमानं सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर मी भारत सरकारच्या प्रतिक्रियेची वाट बघितली. भारतात जन्मलेल्या व जगप्रसिद्ध लेखक असलेल्या धाडसी लेखकांमध्ये रश्दींचा समावेश होतो. या हल्ल्याविरोधात प्रत्येक लोकशाही मानणाऱ्या देशाने मत व्यक्त केलं, परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या पंतप्रधान मोदींना या हल्ल्याचा निषेध करावासा वाटला नाही.” परराष्ट्र मंत्र्यांनी तर चक्क अशी घटना घडल्याचं आपण ऐकल्याची आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा : विश्लेषण : बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी ११ दोषसिद्ध आरोपींची मुदतपूर्व सुटका कशी झाली?
या घटनेमागोमागची दुसरी घटना म्हणजे बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्या नराधमांची तुरुंगातून मुक्तता. या नराधमांनी बिल्किस व तिच्या आईवर बलात्कार केला, तिच्या तीन वर्षाच्या मुलीचं डोकं फोडलं आणि अनेक कुटुंबियांना ठार मारलं. न्यायालयात सिद्ध झालेले हे गुन्हे आहेत.
तवलीन सिंग यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा
तवलीन म्हणतात, या गुन्हेगारांचं खरंतर उर्वरीत आयुष्य तुरुंगामध्ये जायला हवं. पण गेल्या आठवड्यात गुजरात सरकारनं ठरवलं की त्यांनी पुरेशी शिक्षा भोगली असून त्यांना तुरुंगातून सोडायला हवं. अत्यंत धक्कादायक बाब अशी की तुरुंगातून सुटल्यावर त्यांचं हारफुले घालून सत्कार करण्यात आला. आता हे मुक्त झालेले नराधम परत कसे वागतील या भीतीमध्ये व न्याय न मिळाल्याच्या जाणीवेनं बिल्किस बानोला आता रहावं लागेल अशी भीतीही तवलीन यांनी व्यक्त केली आहे.