दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये एकूण ३५ ठिकाणी छापे टाकले आहेत. यापैकी सात छापे पत्रकारांच्या घरात टाकण्यात आले आहेत. हे पत्रकार न्युज पोर्टल न्युज क्लिकशी संबंधित आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
दिल्ली पोलीस स्पेशल सेलने न्युजक्लिकवर UAPA च्या कलमांखाली IPC च्या १५३A (दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), IPC १२०B (गुन्हेगारी कट) गुन्हे दाखल केले आहेत. या संस्थेला चीनकडून निधी मिळाल्याच्या आरोपांमुळे ही संस्था दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या रडारवर आहे. हा निधी बेकायदेशीररीत्या प्राप्त झाला असून त्याची कागदपत्रे अधिकाऱ्यांना देण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
तर, पत्रकार उर्मिलेश, गौरव यादव दिल्ली पोलीस स्पेशल सेल कार्यालयात दाखल झाले आहेत. छाप्यादरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने लॅपटॉप, मोबाइल फोनसह इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले असून हार्ड डिस्कचा डेटाही ताब्यात घेतला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी हे शोध कार्य केले. त्यानुसार, संशयित बेकायदेशीर कृती पोलिसांना आढळून आल्या आहेत. ईडीच्या तपासात तीन वर्षांच्या अल्प कालावधीत ३८.०५ कोटी रुपयांच्या विदेशी निधीची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
न्यूज पोर्टल आणि त्याचे संस्थापक/संपादक यांच्याशी संलग्न निवासस्थाने आणि इमारतींवरही पोलीस छापे टाकत आहेत. तिस्ता सेटलवाड यांच्या घरासह मुंबईतही छापे टाकण्यात आले . दरम्यान, कॉमेडियन संजय राजौरा याला लोधी कॉलनीतील स्पेशल सेलच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले.
याप्रकरणी भाजप नेते आरपी सिंह म्हणतात, “जर एजन्सी त्यांच्या पैशाचा वापर करून चीनचा अजेंडा चालवत असेल तर त्याला परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यांच्या विरोधात आधीच तपास सुरू होता. ते चीनचा वापर करत आहेत. चीनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताची बदनामी करण्यासाठी परदेशातून पैसे घेऊन भारताविरोधात काम करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल.