अतिरेकी कारवायांमुळे अशांत असलेल्या इराकमध्ये इसिसने ओलिस ठेवलेल्या ४६ परिचारिकांची सुटका शुक्रवारी करण्यात आली होती. आज त्या एअर इंडियाच्या खास विमानाने सुखरूप परतल्या. महिनाभर त्या इराकमध्ये अडकून पडल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांच्या भेटीनंतर सुटकेचा निश्वास टाकला.
या खास विमानात इतरही १३७ जण होते ते विमान कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी ११.५७ वाजता उतरले, असे वरिष्ठ विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.
केरळचे मुख्यमंत्री ओमेन चँडी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने केरळमधील परिचारिकांना सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. यातील दोन परिचारिका तामिळनाडूमधील तुतिकोरिनच्या आहेत. परिचारिकांच्या कुटुंबीयांनी त्यांना सुखरूप परत पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. भाजप व काँग्रेस या पक्षांचे नेतेही विमानतळावर आले होते.
या परिचारिका सद्दाम हुसेन यांच्या तिकरित  या गावातील रुग्णालयात काम करीत होत्या. ९ जूनला अतिरेक्यांनी या भागात हल्ला केला तेव्हा इस्लामिक स्टेट फॉर इराक अँड सीरिया या अतिरेकी संघटनेने त्यांना ओलिस ठेवले होते. भारतीय अधिकाऱ्यांनी इराकमधील समपदस्थांशी सतत संपर्कात राहून या परिचारिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. गुरुवारी  त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रुग्णालयातून बाहेर काढून अतिरेक्यांनी काबीज केलेल्या मोसुल या शहरात एका इमारतीच्या तळघरात ठेवले होते. नंतर अतिरेक्यांनीच त्यांना अरबिल विमानतळापर्यंत सोडण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना अरबिल विमानतळावर बसगाडय़ांनी आणले.
शनिवारी सकाळी विमान या परिचारिकांना घेऊन अरबिल येथून उडाले व मुंबईत आले, तेथे इंधन भरल्यानंतर कोचीला आले. परिचारिकांशिवाय १३७ भारतीय नागरिक त्यात होते. त्यातील सत्तर नागरिक उत्तर इराकमधील किरकुक शहरातील होते. इतर २३ कर्मचारी विमानात होते.
मुख्यमंत्र्यांकडून केंद्राचे आभार
परराष्ट्र सेवेच्या संयुक्त सचिव दर्जाच्या आयएफएस महिला अधिकारीही या परिचारिकांना आणण्यासाठी गेल्या होत्या त्याही परत आल्या. मुख्यमंत्री चँडी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, इराकमधील दूतावास, परराष्ट्र मंत्रालय यांचे आभार मानले आहेत. केरळची चिंता लक्षात घेऊन केंद्र सरकारने व इराकमधील भारतीय दूतावास यांनी काम केले व त्यामुळेच परिचारिकांची सुटका होऊ शकली असे चँडी यांनी सांगितले.
राज्य सरकारने या परिचारिकांना त्यांच्या घरी सोडण्याची सोय केली होती.
हा तर पुनर्जन्मच..
पीटीआय, कोची : इराकमध्ये सुरू असलेल्या धुमश्चक्रीच्या काळात आलेल्या अनुभवांवरून आपला पुनर्जन्मच झाला असून आसपास सातत्याने होत असलेल्या बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर तर हे सततच जाणवत होते.. इराकमधून अन्य परिचारिकांसमवेत परतलेल्या सोना आणि वीणा या जुळ्या भगिनींनी सांगितलेल्या या भीषण कथेचा अनुभव इतर परिचारिकांनाही आला होता.इराकमधील तिक्रित आणि आसपासच्या शहरांमधील परिस्थिती आता अधिकच वाईट झाली असून गेल्या अनेक रात्री आपल्याला झोपही मिळालेली नाही, असे या दोघींनी सांगितले. कानठळ्या बसविणारे बॉम्बस्फोट आणि गोळीबार त्यास कारणीभूत ठरले होते. जिवाचा थरकाप उडविणारे आवाज मध्यरात्री केव्हाही ऐकू येऊन झोपमोड होत असे आणि यामुळेच आपल्यासमोरील भवितव्य अत्यंत अंध:कारमय झाले होते आणि म्हणूनच मायदेशी सुखरूप परतणे हा आमच्यासाठी पुनर्जन्मच ठरला, असे सोना आणि वीणा म्हणाल्या.

Story img Loader