नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मोदींसह भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) इतर मित्रपक्षांमधील खासदारांनी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्रिपदाची शपध घेतली. दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या घरी एनडीएतील सर्व नेत्यांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येथे एनडीएतील घटक पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला एंनडीएतील सर्व घटक पक्षांचे नेते तसेच नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री उपस्थित असतील.
जे. पी. नड्डा यांच्या घरी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा मेन्यू देखील खास आहे. यामध्ये सरबत, मिल्कशेक, स्टफ्ड लिची, मटका कुल्फी, आंबे, तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीरसह इतर व्यंजनांचा समावेश आहे. यामध्ये जोधपुरी भाजी, डाळ, दम बिर्यानी आणि पाच प्रकारच्या पोळ्या (चपात्या/रोट्या) असतील. यासह पंजाबी व्यंजनांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाजरीची खिचडी आणि इतर अनेक प्रकारचे सरबत उपलब्ध असतील. यासह ज्यांना मिष्ठान्न आवडतं अशा लोकांसाठी आठ वेगवेगळ्या गोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये रसमलाई, चार प्रकारचे घेवर, चहा आणि कॉफी देखील उपलब्ध असेल.
दरम्यान, आज नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर एनडीएला सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्तास्थापनेसाठीचं गणित जुळवता आलं नसलं, तरी नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देशम पार्टीच्या सहकार्याने मोदींनी हे गणित जुळवून आणलं आहे. या पार्श्वभूमीवर आज नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथविधी पार पडला असून त्यांच्यासह एनडीएमधील अनेक वरीष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
हे ही वाचा >> Live: प्रज्ज्वल रेवण्णाचे काका, JDSच्या एचडी कुमारस्वामींना कॅबिनेट मंत्रीपद
मोदींनंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. मागील मंत्रिमंडळात ते देशाचे संरक्षणमंत्री होते. तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी शपथ घेतली. मोदींच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री होते. चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी यांनी शपथ घेतली. गडकरी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंती तथा नागरी उड्डाणमंत्रिपद भूषवलं आहे. तर पाचव्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शपथ घेतली. नड्डांनंतर शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. चौहान यांचं भाजपाने प्रमोशन केलं आहे.