नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सदस्यांनी मांडलेल्या १४ दुरुस्त्या मंजूर करून संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) सोमवारी वक्फ दुरुस्ती विधेयकाला हिरवा कंदिल दाखवला. विरोधी सदस्यांच्या सर्वच्या सर्व दुरुस्त्या मतविभागणीमध्ये फेटाळण्यात आल्यानंतर, समितीच्या अध्यक्षांनी लोकशाही प्रक्रिया पायदळी तुटवल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समितीच्या अहवालाचा ५०० पानी मसुदा मंगळवारी ‘जेपीसी’च्या सदस्यांना पाठवला जाईल. बुधवारी, २९ जानेवारी रोजी समितीच्या बैठकीमध्ये ‘वक्फ’संदर्भातील शिफारशींचा अहवाल अधिकृतपणे स्वीकारला जाईल. त्यानंतर हा अहवाल लोकसभाध्यक्षांकडे सुपूर्द केला जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर अहवाल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभेच्या पटलावर मांडला जाऊ शकतो. या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकार वक्फ दुरुस्ती विधेयकाचा नवा मसुदा संसदेमध्ये मांडू शकेल.

लोकसभेमध्ये सादर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकामध्ये ४४ अनुच्छेदांमधून विद्यामान वक्फ कायद्यामध्ये बदल सुचवण्यात आले आहेत. सर्व अनुच्छेदांवर सोमवारी ‘जेपीसी’च्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यातील १४ अनुच्छेदामध्ये भाजप व त्यांच्या मित्र पक्षांच्या सदस्यांनी दुरुस्त्या सुचवल्या. विरोधकांनी विधेयकातील ४४ अनुच्छेद फेटाळणाऱ्या दुरुस्त्या मांडल्या. ‘जेपीसी’तील प्रत्येक सदस्याने मांडलेल्या दुरुस्त्यांवर मतविभागणी घेतली गेली. सत्ताधारी सदस्यांच्या १४ अनुच्छेदातील दुरुस्त्या १६ विरुद्ध १० मतांनी मंजूर झाल्या. ‘समितीमध्ये बहुमताच्या आधारे शिफारशी मंजूर करण्यात आल्या’, असे समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितले.

दोन बिगरमुस्लीम सदस्यांची नियुक्ती

दुरुस्ती विधेयकामध्ये वक्फ मंडळावर दोन सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. हे अधिकारी हिंदू वा मुस्लीम वा इतर धर्माचे असू शकतात. त्याव्यतिरिक्त, बिगर-मुस्लीम सदस्यांमध्ये दोन बिगर-सरकारी सदस्यांचा समावेश केला जावा. हे सदस्य हिंदू वा इतर मुस्लिमेतर धर्मातील असतील, अशी महत्त्वपूर्ण शिफारस भाजपच्या खासदाराने केली. नव्या विधेयकामध्ये या शिफारशीचा समावेश केला गेला तर, हिंदू वा बिगर मुस्लीम सरकारी अधिकाऱ्यांसह वक्फ मंडळावर चार बिगरमुस्लीम सदस्य नियुक्त होऊ शकतात.

समितीतील सर्वप्रक्रिया हास्यास्पद होती. समितीच्या अध्यक्षांनी विरोधकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यांचे वागणे हुकमशाहीप्रवृत्तीचे होते. लोकशाही प्रक्रियेचा खेळखंडोबा केला.कल्याण बॅनर्जीसदस्य, तृणमूल काँग्रेस</p>

विरोधकांची एकही दुरुस्ती लोकशाही मतदान पद्धतीमध्ये टिकू शकली नाही. देशातील कायदे व नियम पारदर्शक असावेत यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. वक्फ दुरुस्ती कायदाही पारदर्शक असावा तसेच, गरीब मुस्लिमांना शिक्षण, आरोग्य आदी सुविधांचा लाभ मिळावा यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये विरोधी पक्ष योगदान देऊ शकला नाही.मेधा कुलकर्णीसदस्य, भाजप

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jpc waqf amendment bill by approving 14 amendments moved by nda members amy