पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एका सभेत भाषण करताना वल्गना
भारतावर आणखी दहशतवादी हल्ले करण्याची भाषा जमात-उद-दवा (जेयूडी) या संघटनेचा प्रमुख आणि मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हफीझ सईद याने दिली आहे.
तुम्ही केवळ पठाणकोटवर झालेला हल्ला पाहिला आहे. हे हल्ले आणखी वाढू शकतील, असे सईद याने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये एका सभेत भाषण करताना सांगितले. भारतीय फौजा काश्मिरी लोकांची वांशिक हत्या करत असल्याचा आरोप करतानाच, ‘या लोकांना स्वसंरक्षणासाठी पठाणकोटसारखे हल्ले करण्याचा अधिकार नाही काय,’ असा प्रश्नही त्याने विचारला.
पठाणकोट येथील वायुदलाच्या तळावर २ जानेवारीला झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या युनायटेड जिहाद कौन्सिल (यूजेसी) या संघटनेचा काश्मिरी अतिरेकी नेता सय्यद सलाहउद्दीनची सईदने बुधवारी झालेल्या या सभेत प्रशंसा केली.
पाकिस्तान सरकारने जेयूडी व लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांना प्रसारमाध्यमांवर प्रसिद्धी देण्यास बंदी घातलेली असतानाही गेल्या महिन्यात सईद पाकिस्तानातील ‘चॅनेल २४’ या खासगी दूरचित्रवाहिनीवर दिसला होता. २७ जानेवारीला झालेल्या या कार्यक्रमात त्याने आपली संघटना ‘लोककल्याणाचे’ काम करत असल्याचा दावा केला होता. जमात-उद-दवा आणि (पठाणकोट हल्ल्यामागे असलेल्या) जैश-ए-मोहम्मद यासारख्या संघटनांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भारत आणि अमेरिका पाकिस्तान सरकारवर कशाप्रकारे दबाव आणत आहेत, हेही त्याने सांगितले होते.
पठाणकोट हल्ल्याच्या संदर्भात बोलताना, पाकिस्तान सरकार काही ‘पडद्यामागील सूत्रधार आणि बंदी घातलेल्या संघटनांना’ आश्रय देत असल्याचे सईदने नाकारले होते.
संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ सालीच जेयूडीला दहशतवादी संघटना घोषित केले असून, सईदलाही वैयक्तिकरीत्या दहशतवादी जाहीर केले आहे. अमेरिकेने त्याच्या शिरावर १० कोटींचे बक्षीसही ठेवले आहे.
२००८ साली मुंबईत १६६ जणांचा बळी घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचे नियोजन करणारा सईद दहशतवादी घोषित होऊनही पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत असतो आणि त्याने अनेकदा भारतविरोधी भाषणे व वक्तव्ये केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा