लाहोरमधील कोट लखपत कारागृहात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मरण पावलेला भारतीय कैदी सरबजितसिंग याच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पाकिस्तानातील न्यायालयाने एका न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे.
लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उमर अता बंदियाल यांनी सरबजितसिंगच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी न्या. सय्यद अझहर अली अकबर नक्वी यांची नियुक्ती केली असून त्यांना आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. मात्र त्यासाठी नक्वी यांना मुदत देण्यात आलेली नाही.
त्यापूर्वी पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री नजम सेठी यांनी मुख्य न्यायमूर्तीना पत्र लिहून सरबजितसिंगच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. गेल्या २६ एप्रिल रोजी पाच-सहा कैद्यांनी सरबजितसिंग याच्यावर कारागृहातच प्राणघातक हल्ला केला होता.

Story img Loader