पत्नीची अंतर्वस्त्रे धुतली नाहीत म्हणून न्यायाधीशांनी त्यांच्या कर्मचारी वृंदातील महिला कर्मचाऱ्याला मेमो दिल्याप्रकरणी आता तामीळनाडूतील कर्मचारी संघटनांनी मद्रास उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. पत्नीची अंतर्वस्त्रे धुतली नाहीत आणि त्याबद्दल जाब विचारल्यावर उलट उत्तर दिले म्हणून महिला सहायकाला मेमो देण्याचे प्रकरण आता उच्च न्यायालयात जाणार आहे. तामीळनाडूतील इरोडमध्ये ही घटना घडली. मेमो देण्यात आलेली महिला ४७ वर्षांची असून ती दलित वर्गातील आहे.
इरोडमधील सत्यमंगलम न्यायालयातील कनिष्ठ न्यायाधीश डी. सेल्वम यांनी एक फेब्रुवारीला आपल्या महिला सहायकाला मेमो दिला. त्यामध्ये म्हटले आहे की, जी अंतर्वस्त्रे धुण्यासाठी तुमच्याकडे देण्यात आली होती. ती धुतली नाहीत आणि त्याबद्दल विचारल्यावर उलट उत्तर दिले म्हणून तुमच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचे उत्तर सात दिवसांत लेखी स्वरुपात द्यावे.
संबंधित महिला सहायकाने चार फेब्रुवारीला या मेमोला लेखी उत्तर दिले. त्यामध्ये त्यांनी आपल्याकडून चूक झाली असून, पुढील काळात अशी चूक होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तरी आपल्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती न्यायाधीशांकडे केली.
या प्रकरणी तामीळनाडू न्यायालयीन कर्मचारी संघाचे सरचिटणीस टी. सेंथिल कुमार यांनी घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती आपल्याला मिळाली असून, या प्रकाराविरोधात मद्रास उच्च न्यायालयाच्या महासचिवांकडे लेखी तक्रार नोंदविण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयातील प्रशासकीय कामकाज पाहणारे न्यायमूर्ती एस. नागामुथू यांच्याकडेही या विरोधात याचिका दाखल करण्यात आली असल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा