पीटीआय, इम्फाळ
मणिपूरमधील हिंसाचाराची उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी सांगितले. या चौकशीसंबंधी लवकरच घोषणा केली जाईल. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अमित शहा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये त्यासंबंधी माहिती दिली.
शहा यांनी सांगितले की, राज्यात हिंसाचारामागील षडय़ंत्रांची सीबीआय चौकशी केली जाणार आहे. मणिपूरचे राज्यपाल अनुसूया उईके यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय शांतता समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये कुकी व मैतेई समुदायाच्या प्रतिनिधींचा आणि सामाजिक संघटनांचा समावेश असेल. समुदायांचा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे शहा यांनी सांगितले. त्याचबरोबर सुरक्षा दलांदरम्यान चांगला समन्वय राखण्यासाठी इंटर-एजन्सी युनिफाईड कमांडची स्थापना केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, पोलीस दलामध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले.
राजीव सिंह नवीन पोलीस महासंचालक
राज्यातील पोलीस दलात गुरुवारी वरिष्ठ पातळीवर बदल करण्यात आले. महिनाअखेर निवृत्त होणाऱ्या महासंचालक पी डौंगेल यांना हटवून त्यांच्या जागी दिल्लीतील सीआरपीएफच्या मुख्यालयात महानिरीक्षक या पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. सिंह यांच्याकडे सार्वजनिक हितासाठी विशेष बाब म्हणून तीन वर्षांसाठी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते १९९३ च्या तुकडीचे त्रिपुरा केडरचे अधिकारी आहेत.