विकिलिक्सच्या माध्यमातून सर्वशक्तिमान अमेरिकेच्या कृष्णकृत्यांचा भांडाफोड करणारे विकिलिक्सचे संस्थापक संपादक ज्युलियन असांज सध्या फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी सध्या येथील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ताजी हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्यांना हा आजार झाला असल्याचे समजते. स्वीडिश महिलेवर केलेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अॅसेंज यांना स्वीडनच्या ताब्यात देण्याचा ब्रिटनचा निर्धार आहे. मात्र, जामिनावर सुटका होताच असांज यांनी १९ जून रोजी इक्वेडोरच्या येथील दूतावासात आश्रय घेतला. तेव्हापासून ते तेथेच स्थानबद्ध आहेत. सतत बंद खोलीत राहिल्याने स्वच्छ सूर्यप्रकाश व ताजी हवा न मिळाल्याने असांज यांना फुफ्फुसाच्या आजाराने पछाडले असल्याची माहिती इक्वेडोरच्या राजदूत अॅना अल्बन यांनी दिली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ब्रिटनने परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. असांज यांनी दूतावास सोडल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. अटकेनंतर त्यांची रवानगी स्वीडनला होणार आहे. त्यामुळेच असांज गेल्या काही महिन्यांपासून दूतावासाच्या कार्यालयातच आहेत. ब्रिटिश सरकारने असांज यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्याची परवानगी देण्यास काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, तशी अधिकृत सूचना अद्याप आलेली नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा