लहान मुले व तरुणांमध्ये जंकफूडची निर्माण होत असलेली आवड ही घातक ठरण्याची शक्यता आहे. जंकफूडचा मुलांचा आग्रह पुरवला गेल्यास व आठवडय़ातून त्याचे त्यांच्याकडून तीनदा सेवन झाल्यास लहान मुलांसाठी ते अधिकच हानिकारक ठरणार असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. अल्पवयीन मुलांनी आठवडय़ात तीनदा याचे सेवन केल्यास त्यांच्यातील प्रतिकारकशक्ती कमी होण्याची शक्यता असून त्यांना अस्थमा वा इसब होण्याची दाट शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
जंकफूडमध्ये मोठय़ा प्रमाणात चरबी असते. त्यामुळे शरीरातील स्थूलता बळावण्यास मदत होते. परिणामी मुलांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो, असे स्पष्ट झाले आहे.
बर्गर वा जंकफूडचे सेवन करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आरोग्यावर यामुळे काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. यासंबंधीचा संशोधित अहवाल अलीकडेच प्रकाशित झाला असून त्यात आठवडय़ातून तीनदा जंकफूडचे सेवन करणाऱ्या मुलांमधील ३९ टक्के मुलांना मोठय़ा प्रमाणात दम्याचा विकार होऊ शकतो असे आढळून आले आहे, तर २७ टक्केतरुणांनाही याची बाधा होऊ शकते. जंकफूडचे सेवन करणाऱ्यांमध्ये दृष्टिदोषही निर्माण होऊ शकतात, असे ‘द सन’ने म्हटले आहे.
मात्र जंकफूडचा आस्वाद घेणाऱ्यांनी आठवडय़ातून तीनदा आपल्या आहारात फळे व भाज्यांचा नियमितपणे अंतर्भाव केल्यास तरुणांमध्ये जंकफूडच्या सेवनामुळे निर्माण होणारा धोका १४ टक्क्यांनी तर अल्पवयीन मुलांमध्ये ११ टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असे या पाहणीत आढळून आले आहे.
न्यूझीलंडमधील ऑकलंड विद्यापीठाच्या संशोधकांनी यासाठी सहा ते सात वर्षे वयोगटांतील एक लाख ८१ हजार मुलांची तसेच १३ ते १४ वर्षे वयोगटांतील तीन लाख १९ हजार मुलांची आहाराची पद्धत जाणून घेतली. त्यानंतर रोजच्या आहारात फळे व भाज्यांचा न चुकता वापर करणाऱ्यांना अस्थमा, इसबापासून मोठय़ा प्रमाणात संरक्षण मिळू शकते, असा निष्कर्ष काढला आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा