कोलकात्यात शुक्रवारी आपल्या ग्रहमालेतील गुरू हा सर्वात मोठा ग्रह जास्त चांगल्या पद्धतीने व नेहमीपेक्षा तुलनेने कमी अंतरावरून दर्शन देणार आहे. पृथ्वी ही सूर्य व गुरू यांच्यातून जात असल्याने प्रतियुतीच्या काळात गुरू ग्रह पृथ्वीच्या जवळ येत आहे. या वर्षी ही संधी शुक्रवारी मिळत आहे. पृथ्वीपासून तो ६५० दशलक्ष कोटी किलोमीटर अंतरावर येत आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या एवढा जवळ २०१९ मध्ये येणार आहे.
बिर्ला इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम यांनी गुरू ग्रह बघण्याची सुविधा सेलेस्ट्रॉन टेलिस्कोपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. ही दुर्बीण दहा इंचाची आहे तर कार्ल झेस ही चार इंचाची दुसरी दुर्बीणही निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तारांगणाचे अधिकारी गौतम सील यांनी सांगितले, की ही दुर्मिळ घटना आहे व कोलकाता हे गुरूचे निरीक्षण करण्यासाठी सर्वात चांगले ठिकाण आहे.
त्याच वेळी पूर्ण चंद्रही बघायला मिळणार आहे. सायंकाळी गुरू ग्रह उगवेल व मध्यरात्री तो डोक्यावर उजव्या बाजूला दिसेल व गुरू सकाळी मावळेल. वायूचा गोळा असलेला गुरू हा सूर्यमालेतील पाचवा ग्रह असून तो १२ वर्षांत सूर्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सौरमालेतील सर्वात वेगाने फिरणारा हा ग्रह असून त्याचे परिवलन दहा तासांचे आहे. नासाने गुरूच्या निरीक्षणासाठी ज्युनो हे अवकाशयान पाठवले असून ते २०१६ मध्ये त्याच्या कक्षेत पोहोचेल.
गुरूज्ञान
वायूचा गोळा असलेला गुरू हा सूर्यमालेतील पाचवा ग्रह असून तो १२ वर्षांत सूर्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सौरमालेतील सर्वात वेगाने फिरणारा हा ग्रह असून त्याचे परिवलन दहा तासांचे आहे.
शुक्रवारी पृथ्वीपासून गुरू ६५० दशलक्ष कोटी किलोमीटर अंतरावर येत आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या एवढा जवळ २०१९ मध्ये येईल. त्यामुळे खगोलप्रेमींची कोलकात्यामध्ये गर्दी होईल.