वर्षभर अवकाशात विविध खगोलीय घटना घडत असतात. कधी धुमकेतू दर्शन देतो, कधी उल्का वर्षावाची पर्वणी बघायला मिळते, तर काही वेळा ग्रहाणांचा – सावल्यांचा खेळ सुरु असतो.
सध्या अशीच एक अनोखी पर्वणी खगोलप्रमींना आकाशात अनुभवायला मिळत आहे. पहाटे तीन नंतर ते सूर्य क्षितीजावर येण्याआधीचा काही काळ अशा वेळेत पूर्व दिशेला क्षितीजावर चार ग्रहांचे सहज दर्शन होत आहे. गुरु, शुक्र, मंगळ आणि शनी ग्रह हे आकाशात पहाटे बघायला मिळत आहेत. यानिमित्ताने दुर्बिणीतून एकाच अँगलमधून किंवा दु्र्बिणीचा जरा अँगल बदलत चारही ग्रह सहजपणे टिपण्याची संधी खगोलप्रमींना उपलब्ध झाली आहे. यानिमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या आकाश दर्शनाच्या कार्यक्रमात हे चार ग्रह सहजपणे बघण्याची संधी सर्वसमान्यांना उपलब्ध झाली आहे.
मुंबईतील खगोल मंडळ या संस्थेचे पदाधिकारी अभय देशपांडे सांगतात ” हे चारही ग्रह सध्या म्हणजे एप्रिल महिन्यात पहाटे सहजपणे बघायला मिळत आहे. गुरु ग्रह हा पहाटे तीन नंतर क्षितीजावर दिसायला लागतो, तर पहाटेला साडेपाच नंतर शेवटी शेवटी शनीचे दर्शन होते. एक मे आणखी चांगला योग असणार आहे. या दिवशी पहाटे शुक्र आणि गुरु ग्रह हे आकाशात एकदम जवळ आलेले बघायला मिळतील”.
यानिमित्ताने मंगळ ग्रह यापुढच्या काही महिन्यात पृथ्वीच्या आणखी जवळ यायला सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यात तर साध्या डोळ्यांनी लाल-तांबूस रंगाचा मंगळ ग्रहा आकाशात सहजपणे दिसणार आहे.