बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर रविवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. पहाटे ४.५१ वाजताच्या सुमारास वांद्रे पश्चिमेला असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर अज्ञात हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. अनमोल बिश्नोई या नावाने व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. तसेच हा फक्त ट्रेलर असल्याचेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनमोल बिश्नोई या नावाने व्हायरल होत असलेल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे, “आज झालेला गोळीबार हा फक्त ट्रेलर होता.” गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणे आणि सलमान खानला धमकावणे असा या पोस्टचा उद्देश दिसतो. पहाटे गोळीबार झाल्यानंतर जवळपास पाच तासांनी सकाळी ११.३० वाजता सदर पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात आहे. त्याचा भाऊ असलेल्या अनमोल बिश्नोईने सदर पोस्ट टाकले असल्याचे सांगितले जाते. पोलीस आता या व्हायरल पोस्टचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

धमकीचे पत्र, ई-मेल आणि घराबाहेर गोळीबार! बॉलिवूडचा टायगर गँगस्टरच्या रडारवर का आहे?

“सलमान खान, तुला आमची ताकद दाखविण्यासाठी हा हल्ला केला आहे. तुझ्यासाठी हा शेवटचा इशारा आहे. यानंतर मोकळ्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. ज्या दाऊद आणि छोटा शकीलला तो देव मानतोस, त्यांच्या नावे आम्ही दोन कुत्रे पाळले आहेत. बाकी जास्त काही बोलण्याची मला सवय नाही. जय श्री राम. जय भारत (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप)” अशा आशयाची फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

कोण आहे अनमोल बिश्नोई?

बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ म्हणून अनमोलची ओळख आहे. टाइम्स नाऊने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, अनमोल बिश्नोई सध्या कॅलिफोर्नियामध्ये आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या झाल्यानंतर अनमोल खोट्या पासपोर्टचा आधार घेऊन भारताबाहेर पळून गेला होता. वर्षभरानंतर तो अझरबैजान याठिकाणी असल्याचा ठावठिकाणा लागला होता. मात्र तिथूनही तो निसटला. केंद्रीय गृहखात्याने तयार केलेल्या गँगस्टर्सच्या यादीत अनमोल बिश्नोई उर्फ भानू याच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. एनआयएकडून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केलेले असून तो सध्या अमेरिकेत लपून बसला असल्याचे सांगितले जाते.

विश्लेषण : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिष्णोई नेमका आहे तरी कोण? बिष्णोई गँग कशी सुरू झाली?

कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?

लॉरेन्स बिश्नोई (३१) हा पंजाबमधील गुंड असून त्याच्यावर खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई आणि त्याची गँग आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. लॉरेन्स बिष्णोईची तबब्ल ७०० सदस्यांची बिष्णोई गँग असल्याचं सांगितलं जातं. दिल्ली, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान अशा पाच राज्यांमध्ये झालेल्या अनेक हत्या आणि खंडणीच्या प्रकरणांमध्ये या बिष्णोई गँगचं नाव गुंतलं आहे. लॉरेन्स बिष्णोई हा पंजाबच्या फझिलका जिल्ह्यातल्या अबोहर भागातील दुतारनवली गावाचा आहे. गेल्या वर्षीपासून लॉरेन्स बिष्णोई हा दिल्लीच्या तिहार जेलमध्ये एका गुन्ह्याची शिक्षा भोगतोय. पण असं असलं, तरी लॉरेन्स बिष्णोईच्या कारवाया मात्र सुरूच आहेत. 

“…म्हणून मी गॅंगस्टर झालो”; कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने स्वत:च केला खुलासा!

सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर का आला?

१९९८ साली राजस्थानमध्ये ‘हम साथ-साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळवीटची हत्या केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता. बिश्नोई समाजात काळ्या हरणांना पवित्र मानले आहे; त्यामुळे काळवीटची हत्या केल्याचा आरोप लागल्यापासून अभिनेता सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर होता. परंतु, इतर सर्व टोळ्यांप्रमाणे बिश्नोईची टोळीही सातत्याने चर्चेत राहण्यासाठी हाय प्राफोईल लोकांना लक्ष्य करते, असे तपास यंत्रणांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Just a trailer gangsters threat to salman khan after firing outside house kvg