वादामध्ये अनावश्यक ओढून प्रतिमा मलिन केल्याबाबत ‘त्या’ चार न्यायाधीशांना सुनावले
‘‘आजवरच्या सर्वच सरन्यायाधीशांनी माझ्याकडे अनेक महत्त्वाचे खटले चालवायला दिले. प्रकृती साथ देत नसतानाही मी तीन महिन्यांत चार हजारांहून अधिक खटले निकाली काढले.. पण तरीही माझ्यावर तुम्ही अप्रत्यक्षपणे आरोप केले. माझ्या सचोटीवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले..’’
अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी दुखावलेले न्या. अरुण मिश्रा बोलत होते आणि सर्वोच्च न्यायालयातील सगळेच्या सगळे पंचवीस न्यायमूर्ती (फुल्ल बेंच) शांतपणे त्यांची व्यथा ऐकत होते. न्यायालयामध्ये एरव्ही ठाम वाटणाऱ्या न्या. मिश्रांचा बांध फुटण्याचे कारण म्हणजे त्यांच्यावर न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. जोसेफ कुरियन आणि न्या. मदन लोकूर या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी केलेले अप्रत्यक्षपणे आरोप. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरुद्ध उठाव करताना या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांवर ‘बेंच फिक्सिंग’ करण्याचा म्हणजे मर्जीतील न्यायाधीशांकडेच महत्त्वाचे खटले सोपविण्याचा आरोप केला होता. त्या आरोपांचे बोट न्या. अरुण मिश्रा यांच्याकडे होते. कारण सरन्यायाधीशांनी वादग्रस्त न्या. बी.एल. लोया मृत्यू प्रकरण असो अथवा उत्तर प्रदेशातील वैद्यकीय महाविद्यालयातील वादग्रस्त भ्रष्टाचार प्रकरण असो, ही दोन्ही प्रकरणे न्या. अरुण मिश्रा यांच्याकडे सोपविली होती. जरी त्या पत्रकार परिषदेमध्ये चारही न्यायाधीशांनी अरुण मिश्रा यांचे नाव घेतले नसले तरी त्यांना लक्ष्य केलेच होते. त्यामुळे ते अत्यंत अस्वस्थ होते.
सर्वोच्च न्यायालयात दुफळी पाडणाऱ्या या घटनेनंतर सोमवारी सकाळी १० वाजता जेव्हा सर्वोच्च न्यायालयातील सर्वच्या सर्व २६ न्यायाधीश अनौपचारिक चहापानासाठी जमले तेव्हा न्या. अरुण मिश्रांना राहवले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, त्या चार न्यायाधीशांकडे पाहत ते म्हणाले, ‘‘मी माझे कर्तव्य न्यायबुद्धीने करीत आलो आहे. आजवरच्या सर्वच्या सर्व सरन्यायाधीशांनी माझ्याकडे महत्त्वाचे खटले सोपविले होते; पण तुम्ही या वादात माझे नाव विनाकारण गोवले. जनतेच्या नजरेमध्ये माझी प्रतिमा मलिन केली. माझ्या सचोटीवर शंका घेतली आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले..’’ हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. डोळ्यांत अश्रू डबडबले होते. मग त्या चारही ज्येष्ठ न्यायाधीशांनी त्यांचे सांत्वन केले आणि तुमची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू नसल्याचे त्यांना समजावले. तरीही न्या. अरुण मिश्रांना स्वत:ला रोखता न आल्याने शेवटी सरन्यायाधीश दीपक मिश्रांनी त्यांना बैठकीपासून दूर नेले.
भारतीय बार कौन्सिलचे सर्वात तरुण अध्यक्ष बनण्याचा मान मिळविलेले न्या. अरुण मिश्रा यांनी राजस्थान आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषविलेले आहे. त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये २०१४ मध्ये नियुक्ती झाली. ते सध्या ज्येष्ठतेत दहाव्या क्रमांकावर आहेत. वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीशांवर थेट आरोप केले होते, तेव्हा न्या. अरुण मिश्रांनी त्यांची चांगलीच हजेरी घेतली होती. त्यांचे भाजप नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेचे माजी अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी केला होता.