काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मोदी चोर’ वक्तव्याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. यावर शुक्रवारी (२१ जुलै) सुनावणी झाली. यात या याचिकेवर नोटीस जारी करत ४ ऑगस्टला पुढील सुनावणी ठेवण्यात आली. विशेष म्हणजे या सुनावणी आधी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठतील न्यायमूर्ती गवई यांची एक कृती सर्वांनाच भावली. गवई यांनी ही राजकीय पक्षाच्या नेत्याशी संबंधित याचिका असल्याने स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांची राजकीय पार्श्वभूमी जाहीर केली. तसेच त्यांनी याचिकेची सुनावणी करावी की नाही हे पक्षकारांनी ठरवावं असं स्पष्ट केलं.
सुनावणीला सुरुवात होताच न्यायमूर्ती गवई यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे काँग्रेसशी असलेले संबंध स्पष्ट केले. तसेच याचिकेतील दोन्ही बाजूंना यावर काही आक्षेप असेल तर सांगावं, असंही नमूद केलं. ते म्हणाले, “सुनावणी घेण्याआधी मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. माझे वडील काँग्रेसचे सदस्य नव्हते, मात्र, त्यांचे काँग्रेसशी राजकीय संबंध होते. ते काँग्रेसच्या पाठिंब्यावर विधीमंडळ आणि संसदेचे सदस्य होते. माझा भाऊ आजही राजकारणात आहे आणि तो काँग्रेसशी संलग्न आहे.”
“मी सुनावणी घ्यावी की नाही हे दोन्ही बाजूच्या वकिलांनी ठरवावं”
“माझी अशी पार्श्वभूमी लक्षात घेता मी या प्रकरणाची सुनावणी घ्यावी की नाही याबाबत दोन्ही बाजूच्या वकिलांनी ठरवावं. व्हिक्टोरिया गौरी प्रकरणातही माझी राजकीय पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं. तसेच २० वर्षांपासून मी न्यायाधीश असून माझ्या पार्श्वभूमीचा माझ्या निकालांवर कधीही परिणाम झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात मी सुनावणी घ्यावी की नाही याचा तुम्ही निर्णय घ्या,” असं न्यायमूर्ती गवई यांनी नमूद केलं.
हेही वाचा : ‘मोदी चोर’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींच्या याचिकेवर ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
सिंघवींकडून न्यायमूर्तींच्या भूमिकेचं कौतूक
यानंतर ज्येष्ठ वकील सिंघवी आणि रामजेठमलानी दोघांनीही एकमताने त्यांना या राजकीय पार्श्वभूमीवर कोणताही आक्षेप नसल्याचं म्हटलं. न्यायमूर्ती गवई यांनी खुलेपणाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची राजकीय पार्श्वभूमी सांगत पक्षकारांना निर्णय घेण्याबाबत विचारणा केली, या भूमिकेचं सिंघवी यांनी सुनावणीच्या शेवटी कौतूक केलं. यावर न्यायमूर्ती गवई म्हणाले, “पक्षकारांना हे सांगणं माझं कर्तव्यच आहे. प्रत्येकाला माझ्याविषयी ही माहिती असायला हवी. उद्या काही अडचण व्हायला नको.”
न्यायमूर्ती गवई, वकील सिंघवी आणि जेठमलानी तिघांचे वडील मित्र
“योगायोगाने माझे वडील आर. एस. गवई, सिंघवी यांचे वडील लक्ष्मी माल सिंघवी आणि जेठमलानी यांचे वडील राम जेठमलानी असे सर्व संसदेचे सदस्य होते. ते चांगले मित्र होते. एका निवडणुकीच्या प्रकरणात कनिष्ठ वकील म्हणून मी राम जेठमलानी यांच्याबरोबर कामही केलं,” असंही गवईंनी नमूद केलं.