लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. गांगुली यांनी सरन्यायाधीश पी. सतसिवम यांना पत्र लिहून, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडून योग्य रीतीने हाताळले गेले नाही, अशी तक्रार केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला गेला असून, यामागे काहीजणांचे हितसंबंध जोडले गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मार्गदर्शन घेण्यासाठी आलेल्या विधी शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप न्या. गांगुली यांच्यावर आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढत आहे. मात्र आपल्यावर झालेले आरोप चुकीचे आहे, असे सांगून त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. सोमवारी सरन्यायाधीशांना आठ पानी पत्र पाठवून त्यांनी आपल्याविरोधात षड्यंत्र रचले असल्याचा आरोप केला.
‘‘या प्रकरणामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मी व्यथित झालो आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले गेले नाही, हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे,’’ असे गांगुली यांनी या पत्राद्वारे सांगितले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही हे पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सरन्यायाधीश कार्यालयाकडून न्या. गांगुली यांच्या पत्रांबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या सरन्यायाधीश सुट्टीनिमित्त शहराबाहेर असून, ते आल्यानंतर या प्रकरणी प्रतिक्रिया देतील, असे या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Story img Loader