वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मार्कंडेय काटजू यांच्या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काटजू यांनी त्यांच्या ब्लॉगवर महात्मा गांधी हे ब्रिटीश सरकारचे हस्तक असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. ‘मी दाव्यानिशी सांगतो की, महात्मा गांधी हे ब्रिटिशांचे हस्तक होते आणि त्यांनी भारताचे अपरिमित नुकसान केले. माझ्या या वक्तव्याला अनेकांचा आक्षेप असून, ते याविषयी निषेध नोंदवतील’, असे काटजू यांनी स्वत:च्या ब्लॉगवर लिहिले आहे. काटजू यांनी स्वत:चे विधान पटवून देण्यासाठी तीन कारणे दिली आहेत. यामध्ये ब्रिटिशांनी ज्याप्रकारे भारतीय राजकारणात अनेक दशके जातीचे विष पेरले, तशाचप्रकारे महात्मा गांधी यांनीही ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब केल्याचे काटजू यांनी म्हटले. याशिवाय, महात्मा गांधी यांनी क्रांतिकारी मार्गाने जाणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीला मूर्ख आणि इजा न पोहोचवू शकणाऱ्या सत्याग्रहाकडे वळविले. अशाप्रकारे गांधींनी ब्रिटीशांना त्यांचा हेतू साध्य करण्यात मदत केल्याचे काटजू यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. महात्मा गांधी यांच्या आर्थिक संज्ञा प्रतिगामी असल्याचे सांगत काटजूंनी त्यांच्यावर ब्लॉगमधून जोरदार टीका केली. महात्मा गांधी ज्या स्वयंपूर्ण गावांच्या निर्मितीवर भर देण्यास सांगत होते, ती गावे जातीव्यवस्था मानणारी आणि सावकार, जमीनदार यांचा पगडा असलेली असल्याचे काटजू यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा