वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. काटजू यांनी मंगळवारी त्यांच्या ब्लॉगवर अभिनेत्री कतरिना कैफ देशाची पुढील राष्ट्रपती व्हायला पाहिजे, अशा आशयाचे विधान केले होते. मात्र, या वक्तव्यावरून उमटणारे टीकेचा सूर पाहता दुसऱ्या दिवशी फेसबूकवर सारवासारव करताना आपण ते वक्तव्य सहजपणे केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही काटजू यांनी सांगितले.

फोटो गॅलरी – कतरिना कैफ @ ३० : बॉलिवूड प्रवासातील काही विशेष टप्पे 

याविषयी अधिक स्पष्टीकरण देताना काटजू यांनी क्रोएशियातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा दाखला दिला. ज्याप्रकारे कोलिंदा ग्रॅबर किटारोव्हिक क्रोएशियाच्या अध्यक्षपदी निवडून आल्या, तशाचप्रकारे अन्य सगळ्या पदांवर सुंदर स्त्रिया निवडून आल्या पाहिजेत, असे माझे मत असल्याचे काटजू यांनी म्हटले आहे. राज्यकर्ते हे नेहमी चंद्रावर जायच्या गप्पा मारतात. मात्र, प्रत्यक्षात ते सामान्यांच्या किमान अपेक्षाही पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे निवडणुकीत तुम्हाला कोणाही एकाला निवडायचेच असेल, तर मग एखादा सुंदर चेहरा का निवडू नये? किमान त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर तुम्हाला क्षणिक समाधान तरी मिळेल. त्यानंतर काटजू यांनी आपल्या ब्लॉगमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ भारताची पुढील राष्ट्रपती झाली पाहिजे, असे म्हटले. मात्र, पद स्वीकारताना तिने शीला की जवानी या गाण्यावर नृत्य केले पाहिजे. त्यांच्या या वकव्यानंतर सोशल साईटसवर अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसला.

Story img Loader