न्यायालयीन प्रक्रियेत आपल्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचे वाटत असल्यामुळे न्याय सहजसाध्य होण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी तो अद्याप सामान्य माणसासाठी चेष्टेचाच विषय ठरला असल्याची खंत सरन्यायाधीश पी. सत्यशिवम् यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.
राष्ट्रीय कायदा सेवादिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते. सत्यशिवम् यांनी या कार्यक्रमात परखड मते मांडली. न्यायालयीन प्रक्रियेत आपल्या हिताकडे लक्ष दिले जात नाही आणि त्यामुळे आपल्याला न्याय मिळत नसल्याचा समज अद्यापही लोकांच्या मनात मोठय़ा प्रमाणावर आहे. हा समज दूर होऊन लोकांमध्ये जागरूकता वाढीस लागावी आणि त्यांची मानसिकताही बदलावी यासाठी प्रयत्न करण्यावर सरन्यायाधीशांनी भर दिला. सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्या. जी. एस. सिंघवी यांनीही सरन्यायाधीशांच्या मताला दुजोरा देत न्याय म्हणजे एक भ्रामक बाब आहे, असे देशभरातील लक्षावधी लोकांना असल्याचे मत मांडले. आपल्या न्यायालयांकडून कायद्यासाठी कायदा राबविला जातो, न्यायासाठी त्याचे अधिष्ठान नसते, अशी समजूत सामान्य भारतीय लोकांच्या मनात रुजली आहे, याकडेही सरन्यायाधीशांनी लक्ष वेधले.
गेल्या ६५ वर्षांत सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत का, तसेच लोकांना समानतेचा न्याय आणि त्यांना योग्य दर्जा मिळवून देण्याकामी आपण यशस्वी ठरलो आहोत काय याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे, असे प्रतिपादन न्या. सिंघवी यांनी केले. लक्षावधी लोकांना अजूनही न्यायाची संकल्पनाच भ्रामक वाटते आणि तो सहजसाध्य नाही, असेही त्यांचे मत असून लोकांच्या दारी त्यांना न्याय मिळावा म्हणून अथक प्रयत्न करण्याची जबाबदारी न्यायदान करणाऱ्या आपल्याच शिरावर आहे, असेही सिंघवी यांनी नमूद केले.
न्यायालयीन कामकाजात दिरंगाई, पुरेशी जागरूकता नसणे, निरक्षरता, न्यायालयीन खटले लढविण्यासाठी होणारा खर्च आणि कंटाळवाणे कामकाज आदी कारणांमुळे लक्षावधी लोकांना अन्याय सहन करावा लागतो, असे सांगून समाजातील दुर्बळ घटकांचे खटले हाताळताना न्यायाधीशांनी मानवतेची भूमिका घ्यावी, असे आवाहन न्या. सिंघवी यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justice still a cynical phrase for common man says cji