Cash found at HC judge’s house : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी रोख रक्कम सापडल्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. दरम्यान त्यांच्यावर होत असलेले आरोप वर्मा यांना फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कधीही घराच्या स्टोअररूममध्ये रोख रक्कम ठेवली नाही असे वर्मा म्हणाले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. के. उपाध्याय यांना सादर केलेल्या उत्तरात वर्मा यांनी त्यांच्या घरातून रोख रक्कम आढळल्याचे आरोप हे स्पष्टपणे त्यांना फसवण्याचे आणि बदनाम करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्या अंतर्गत चौकशीचे आदेश दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी वर्मा यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. यावर न्यायमूर्ती वर्मा यांनी आपले उत्तर दाखल केले आहे.
यावेळी त्यांनी माध्यमांना देखील सल्ला दिला आहे. माध्यमांनी आरोप करण्यापूर्वी आणि त्यांना बदनाम करण्यापूर्वी थोडी चौकशी केली पाहिजे असे वर्मा म्हणाले आहेत. तसेच न्यायमूर्ती वर्मा यांनी आऊटहाऊस स्टोअररूमध्ये रोख रक्कम असल्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचेही म्हटले आहे.
“मला किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला या रोख रकमेबद्दल काही माहिती नव्हती आणि या माझ्याशी किंवा कुटुंबाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्या रात्री हजर असलेल्या माझ्या कुटुंबातील सदस्यांना किंवा कर्मचार्यांना अशी रोख रक्कम दाखवण्यात आली नाही,” असे यशवंत वर्मा त्यांच्या उत्तरात म्हणाले आहेत.
“स्टोअररूममधून आम्ही कोणतेही चलन हटवल्याचा आरोप होत असेल तर तो मी स्पष्टपणे नकारतो आणि फेटाळून लावतो. वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला जळलेल्या नोटांच्या कोणत्याही पिशव्या दाखवल्या किंवा देण्यात आल्या नाहीत. खरंतर, आणि वर सांगितल्याप्रमाणे, जे थोड्या प्रमाणात अवशेष वाचवण्यात आले होते ते अजूनही निवासस्थानाच्या एका भागात तसेच आहेत,” असेही न्यायाधीश वर्मा म्हणाले.
घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना वर्मा यांनी सांगितलं की, १४-१५ मार्च २०२५ च्या मध्यरात्री त्यांच्या अधिकृत निवासस्थानातील स्टाफ क्वार्टरच्या जवळ असलेल्या स्टोअररूमला आग लागली. तसेच त्यांनी सांगितले की, या खोलीचा वापर हा फर्निचर, बाटल्या, भांडी, गाद्या, वापरलेले कार्पेट, जुने स्पीकर्स, बागकामाचे साहित्य आणि सीपीडब्ल्यूडी साहित्य अशा वापरात नसलेल्या वस्तू ठेवण्यासाठी केला जातो.
“ही खोली अधिकृत प्रवेशद्वार आणि मागील स्टाफ क्वार्टर्स अशा दोन्ही बाजूंनी उघडते आणि त्यामध्ये प्रवेश केला जाऊ शकतो. ही खोली मुख्य निवास्थानापासून वेगळी आहे आणि निश्चितपणे माझ्या घरातील खोली नाही, जसं की टाइम्स ऑफ इंडिया आणि इतर काही न्यूज रिपोर्ट्समध्ये दाखवण्यात आणि सूचित करण्यात आले आहे,” असेही वर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
“त्या दिवशी मी आणि माझी पत्नी दिल्लीत नव्हतो आणि मध्य प्रदेशात प्रवास करत होतो. फक्त माझी मुलगी आणि वृद्ध आई याच घरी होत्या. मी १५ मार्च २०२५ च्या संध्याकाळी भोपाळहून माझ्या पत्नीबरोबर इंडिगोच्या विमानाने प्रवास करून दिल्लीला परतलो,” असेही वर्मा म्हणाले आहेत. मध्यरात्री जेव्हा आग लागली तेव्हा त्यांच्या मुलीने आणि खाजगी सचिवाने अग्निशामक दलाला कळवले आणि त्यांचे फोन कॉल्स रेकॉर्ड विचारात घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले.
तेव्हा नोटा दिसल्या नाहीत
“आग विझविणताना सगळे कर्मचारी आणि घरातील सर्व सदस्यांना सुरक्षेच्या कारणास्तव घटना स्थळावरून दूर जाण्यास सांगण्यात आले. जेव्हा आग विझविण्यात आली आणि जेव्हा ते घटनास्थळावर परत गेले तेव्हा त्यांना कोणतीही रोख रक्कम किंवा नोटा दिसल्या नाहीत.”
“मी स्पष्टपणे सांगतो की त्या स्टोअररूममध्ये मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कधीही रोख रक्कम ठेवली नाही आणि कथित रोख रक्कम आमची आहे असे सांगितले जात असल्याचा मी तीव्र निषेध करतो. ही रोकड आम्हीच ठेवली किंवा जमा केली होती ही कल्पना पूर्णपणे हास्यास्पद आहे,” असे न्यायमूर्ती वर्मा म्हणाले आहेत.
खोली घरापासून वेगळी?
“ही एक खोली आहे जी माझ्या राहण्याच्या जागेपासून पूर्णपणे वेगळी आहे आणि बाऊंड्री वॉल माझी राहण्याची जागा आणि आऊट हाऊस यांना वेगळं करते. माझी एवढीच इच्छा आहे की, माध्यमांनी माझ्यावर आरोप ठेवण्यापूर्वी आणि प्रेसमध्ये बदनामी करण्यापूर्वी थोडीशी चौकशी करायला हवी होती,” असेही वर्मा म्हणाले आहेत.
१४ मार्च रोजी होळीच्या रात्री ११.३५ वाजता न्यायमूर्ती वर्मा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी लागलेल्या आगीनंतर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यांची समिती स्थापन करून न्यायमूर्ती वर्मा यांची अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.