खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. या हत्येवरून कॅनडाने भारतावर वेगवेगळे आरोप केल्यानंतर उभय देशांमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप करत कॅनडा सरकारने तिथल्या भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. त्यापाठोपाठ भारतानेही स्पष्ट शब्दांत कॅनडा सरकारला ठणकावलं आणि भारतातल्या कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. तेव्हापासून दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी याप्रकरणी भारताविषयी आणखी एक वक्तव्य केलं आहे.
कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले, अत्यंत गंभीर विषयांवर आम्हाला भारताबरोबर काम करायचं आहे आणि आम्ही ते त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. अगदी सुरुवातीपासूनच आम्ही पुराव्यांच्या आधारे खरे आरोप केले. कारण, याप्रकरणी आम्ही खूप गंभीर आहोत. म्हणूनच आम्ही या गोष्टी भारतासह जगभरातील आमच्या भागीदारांबरोबर शेअर केल्या. त्यानंतर भारताने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं, त्यापाठोपाठ त्यांनी भारतातल्या कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. त्याचं आम्हाला खूप वाईट वाटलं.
ट्रुडो म्हणाले, भारत सरकारचे एजंट हे एका हत्येत गुंतले असावेत, आमच्याकडे यासंबंधीचे पुरावे आहेत. कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाची हत्या करणे म्हणजे व्हिएन्ना कन्व्हेन्शनच्या नियमांचं उल्लंघन आहे. तसेच कॅनेडियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी करणं हेदेखील नियमाचं उल्लंघन आहे.
हे ही वाचा >> VIDEO : उत्तरकाशीत मोठी दुर्घटना, निर्माणाधीन बोगद्याचा ५० मीटरपर्यंतचा भाग कोसळला, ३६ मजूर अडकले
कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, एखाद्या देशाने दुसऱ्या देशाच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांना संरक्षण दिलं जाणार नाही असं म्हणणं हा जगभरातील देशांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक गंभीर होतात. परंतु, प्रत्येक टप्प्यावर आम्ही भारताबरोबर सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही करत राहू. याचाच अर्थ आम्ही त्यांच्या मुत्सद्दी अधिकाऱ्यांबरोबर काम करत राहू. आम्हाला आत्ता अशी लढाई लढायची नाही. परंतु, कायद्याच्या राज्यासाठी आम्ही नेहमीच उभे राहू.