दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील JNU विद्यार्थ्यांनी भगव्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळेच केंद्र सरकारने त्यांच्यावर कारवाई केली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी लोकसभेत केला.
रोहित वेमुला आत्महत्या आणि जेएनयू या प्रकरणांवर लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. चर्चेमध्ये भाग घेताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजपचे नेते जरी सबका साथ, सबका विकास म्हणत असले, तरी देशातील लोक आता किसका साथ, किसका विकास असा प्रश्न विचारत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रसारासाठी देशातील प्रशासकीय व्यवस्थेचा दुरुपयोग करीत आहे. रोहित वेमुला प्रकरणावरून हे स्पष्टपणे दिसून आले आहे. जेएनयूमधील ज्या विद्यार्थ्यांनी भगव्या दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे. केवळ आठ ते दहा विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण संस्थेला बदनाम करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
रोहित वेमुला प्रकरणावरून मायावती आणि स्मृती इराणी आमनेसामने
देशविरोधी घोषणा देण्याचा आम्ही सगळेच निंदा करतो. पण केवळ घोषणा देणे म्हणजे राष्ट्रद्रोह ठरत नाही. सर्वोच्च न्यायालयाने केदारनाथ सिंग प्रकरणा यासंदर्भात अत्यंत स्पष्ट निकाल दिला आहे. केवळ शब्दांचा वापर करणे म्हणजे देशद्रोह ठरत नाही. तरीही सरकारने कन्हैया कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप ठेवला आहे. पोलीस सुरक्षा असतानाही कन्हैया कुमारवर हल्ला करण्यात आला. पत्रकारांना मारण्यात आले. यावर सरकारने कोणतीच कारवाई केलेली नाही, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
भाजपचे खासदार आणि विविध राज्यांतील आमदार अत्यंत वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधाने करीत आहेत. त्यावरही भाजपचे ज्येष्ठ नेते काहीच बोलत नाहीत, असे सांगून ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता स्टार्टअप इंडिया, स्टॅंडअप इंडिया ही नवी घोषणा दिली आहे. पण देशातील लोकांची घोषणा आहे की ‘लिव्ह अॅण्ड लेट लिव्ह इन इंडिया’.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा