Jyotiraditya Scindia in Parliament Winter Session 2024 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी (११ डिसेंबर) मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी या दोघांमध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. कल्याण बॅनर्जी सिंधिया यांना म्हणाले, “तुम्ही सभागृहातील रुबाबदार व्यक्ती आहात, परंतु तुम्ही खलनायक देखील असू शकता”. बॅनर्जी एवढ्यावरच थांबले नाहीत. ते सिंधिया यांना म्हणाले, “तुम्ही लेडी किलर आहात”. त्यानंतर सिंधिया यांचा देखील पारा चढला व त्यांनी बॅनर्जी यांच्या प्रत्येक वक्तव्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं. कल्याण बॅनर्जी म्हणाले, “तुम्ही सिंधिया घराण्यातील महाराज आहात म्हणून तुम्ही इतरांना लहान समजता का?” यावर सिंधिया म्हणाले, “तुम्ही माझ्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करत आहात. माझं नाव ज्योतिरादित्य सिंधिया आहे. तुम्ही माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या घराण्याबद्दल काही वाईट बोलाल तर ते मी सहन करणार नाही. मीच काय माझ्या जागी दुसरा कोणी इथे असेल तर तो देखील हे सहन करणार नाही”. सिंधिया यांचा पारा चढलेला पाहून आणि स्थिती हाताबाहेर जातेय हे लक्षात येताच बॅनर्जी यांनी माघार घेतली व माफी मागितली. मात्र, सिंधिया त्यांना म्हणाले, “मी तुमच्या माफीचा स्वीकार करणार नाही”.
सिंधिया यांनी माफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर कल्याण बॅनर्जी म्हणाले, “सिंधिया यांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी पुन्हा एकदा सॉरी म्हणतो (माफी मागतो)”. त्यानंतर सिंधिया पुन्हा एकदा उभे राहिले आणि म्हणाले, “आपण सर्वजण इथे राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही आमच्या धोरणांवर टीका करू शकता. परंतु, या सभागृहात कोणीही कोणावरही वैयक्तिक पातळीवर टीका करू नये. प्रत्येक माणसाला त्याचा स्वाभिमान असतो. ते सॉरी म्हणत आहेत. मात्र मी त्यांच्या माफीची स्वीकार करू शकत नाही. त्यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे”. त्यानंतर कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर खासदारांनी गोंधळ घातला. या गदारोळानंतर सभागृहाचं कामकाज सायंकाळी पाच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
हे ही वाचा >> अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई?
भाजपाच्या महिला खासदारांची तक्रार
कल्याण बॅनर्जी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, “कल्याण बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या महिला खासदारांनी थेट संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे तक्रार केली आहे. या महिला खासदारांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की “कल्याण बॅनर्जी यांनी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली आहे. ही टीका करत असताना त्यांनी महिलांचा देखील अपमान केला आहे. कल्याण बॅनर्जी यांची सभागृहातून हकालपट्टी करावी”.