दलितांवर होत असलेल्या अत्याचारांचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित न करू दिल्यामुळे गेल्याच आठवड्यात ‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही लोकसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान भाजपचे खासदार वीरेंद्र कुमार आणि मनोहर उटवाल यांनी शिंदे यांच्यावर काही आरोप केले होते. सिंधिया यांनी मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आणि दलितविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर शिंदे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भाजपने जर मी दलितविरोधी असल्याचे सिद्ध करून दाखवले तर मी स्वत:च्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे. तसेच त्यांनी भाजपच्या दोन्ही खासदारांवर हक्कभंगाचा प्रस्तावही दाखल केला आहे.
माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. या आरोपांमुळे संसदेच्या सभागृहातील प्रतिष्ठित सदस्य म्हणून असलेली माझी प्रतिमा मलिन झाली आहे. याशिवाय, हे सर्व आरोप स्पष्टपणे दिशाभूल करणारे आहेत. लोकसभेतील कामकाजाचे प्रसारण देशातील कोट्यवधी लोक पाहत असतात. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेले आरोप या लोकांची दिशाभूल करण्यासारखे असल्याचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले.
मायावतींकडून राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा
ज्या कार्यक्रमावरून हा वाद सुरू आहे ती घटना मध्य प्रदेशात घडली होती. भाजपच्या दाव्यानुसार मध्य प्रदेशातील ट्रॉमा केअर सेंटरच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी भाजपचे दलित आमदार या ठिकाणी गेले होते. त्यामुळे काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे या ठिकाणी येण्याच्या आधी ही जागा गंगेचे पाणी शिंपडून पवित्र करून घेतली. मध्य प्रदेशच्या विधानसभेतही या मुद्द्यावरूनही मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता.